CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी १० मिनिटं ऊन अंगावर घेणं गरजेचं, तज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:50 AM2020-04-30T10:50:50+5:302020-04-30T11:25:26+5:30

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. कारण कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात ऑस्ट्रेलियातील आरोग्य तज्ञांनी दावा केला आहे की १० मिनिटं उन्हात उभं राहिल्यामुळे कोरोनाचं संक्रमण कमी होऊ शकतं.

स्किन कॅन्सर एक्सपर्ट असलेल्या डॉक्टर राचेल नेले यांनी सांगितले की, सुर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यामुळे व्हिटामीन डी मिळतं. जर शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असेल तर संक्रमणाची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असता कामा नये. नेहमीच्या तुलनेत व्हिटामीन डी चं प्रमाण जास्त असायला हवं. व्हिटामीन डी चा परिणाम शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीवर होऊ शकतो. त्यामुळे कमतरता असेल तर कोरोना व्हायरसची लक्षणं दिसू शकतात.

कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये श्वसनांसंबंधी समस्यांचासुद्धा समावेश होतो. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर नेले यांनी मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं की, व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्समुळे श्वसनांसंबंधी संक्रमण कमी झाले आहे.

सुमारे ७८ हजार लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, व्हिटामीन डी मोठया प्रमाणावर शरीरात असलेल्या रुग्णांच्या तुलनेत व्हिटामीन डी ची कमतरता असलेल्या रुग्णांना श्वासांसंबंधी आजार होण्याचा धोका दुप्पट होता. याशिवाय व्हिटामीन डी ची कमतरता असलेले लोक जास्तवेळ आजारी असतात.

शरीरात व्हिटामीन डी चं योग्य प्रमाण ठेवून आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज ५ ते १० मिनिटं उन्हात उभं राहत असल्याचं डॉक्टर नेले यांनी सांगितले. व्हिटामीन डी च्या गोळ्या घेण्यापेक्षा उन्हात बसल्यामुळे अधिक फायदा मिळतो. पण जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांना व्हिटामीन डी च्या गोळयांची आवश्यकता असते.

सध्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसंच सर्वाधिकवेळ आपल्या घरात आहेत. बाहेर न पडल्यामुळे सुर्याची किरणं अंगावर येत नाही. म्हणून व्हिटामीन डी ची कमतरता भासण्याची शक्यता आहेत. पण लॉकडाऊनमध्ये सुद्धा तुम्ही आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता

कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी लॉकडाऊनमध्ये बाहेर गर्दी करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. घराच्या छतावर किंवा बाल्कनीत जाऊन तुम्ही ऊन अंगावर घेऊ शकता. खाण्यापिण्यातून व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता.

त्यासाठी आहारात हिरव्या ताज्या भाज्या, अंडी, एक ग्लास दूध, डाळींचा समावेश करा. डॉक्टरांशीं संपर्क साधून तुम्ही व्हिटामीन डी चे सप्लिमेंट्स घेऊ शकता. व्हिटामीन डी मध्ये डाएटरी फायबर्स मोठ्या प्रमाणांवर असतात. म्हणून सप्लिमेंट्स किंवा व्हिटामीन डी च्या गोळ्याचं सेवन डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करा.