CoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'

By ravalnath.patil | Published: September 24, 2020 02:13 PM2020-09-24T14:13:24+5:302020-09-24T14:31:06+5:30

देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांचे म्हणणे आहे की, लोकांनी खबरदारी न घेतल्यास सुमारे ८५ टक्के लोकांना म्हणजेच एक अब्ज लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते.

लोकांना आता मास्क, सोशल डिस्टंसिंग यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तसेच, देशातील जवळजवळ ८०-८५ टक्के लोक असे आहे की, त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. देशात कोविड-१९ प्रकरणे देशात वाढत आहेत आणि व्हायसरचा प्रसार झपाट्याने होत आहे, असे पॉल यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसचे संक्रमण हे एका व्यक्तीपासून पाच लोकांमध्ये आणि पाच लोकांपासून पन्नास लोकांपर्यंत पसरू शकते. रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे, असे पॉल यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसला कोणीही रोखू शकत नाही, परंतु आम्ही काही नियमांचे पालन करून निश्चितपणे त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मास्क घालून आणि सोशल डिस्टंसिंग ठेवून या महामारीवर नियंत्रण मिळू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे, असेही पॉल यांनी सांगितले.

दुसरीकडे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ८०-८५ टक्के भारतीय अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत आणि उर्वरित १५ टक्के लोकांना एकतर कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा त्यांच्यामध्ये व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले होते की, हर्ड इम्युनिटी विकसित होण्यास थोडा वेळ लागेल, त्यामुळे ही महामारी रोखण्यासाठी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची व कंटेनमेंटसाठी रणनीती तयार करण्यावर सरकारचे लक्ष आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, सेरो सर्वेक्षणात असे आढळले आहे की बहुतेक लोक कोरोना व्हायरसच्या धोक्यात आहेत.

आयसीएमआरच्या नॅशनल सेरोलॉजिकल सर्व्हेच्या निकालानुसार, बहुतांश लोक कोरोना संक्रमणाबाबत अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी भारताला आवश्यकतेनुसार एक सार्वजनिक आरोग्य धोरण आखले पाहिजे.

सतत लोकसंख्या-आधारित सेरो सर्वेक्षण केल्यामुळे कोरोना महामारीबाबत आमची रणनीती कोणत्या दिशेने जात आहे, हे शोधणे सोपे होते. त्यामुळे त्याचे योग्य मूल्यांकन करू शकतो. सेरो सर्वेक्षण ८० हून अधिक जिल्ह्यांत सुमारे २८,००० लोकांवर करण्यात आला होता, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

जुलै महिन्यात दिल्लीतील सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सुमारे २३ टक्के लोकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यात आले होते. उर्वरित ७७ टक्के अतिसंवेदनशील श्रेणीत होते. हा सेरो सर्व्हे आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे केले होते.

दरम्यान, भारतात येणारा काळ उत्सवांचा असणार आहे. जर सर्व लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास भविष्यात आपल्याला एक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे आयसीएमआरमधील महामारी संशोधनाचे प्रमुख ललित कांत यांनी सांगितले.

Read in English