coronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 02:12 PM2020-09-22T14:12:11+5:302020-09-22T14:24:53+5:30

कोरोनाबाबत होत असलेल्या संशोधनामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतातही कोरोनाच्या फैलावामुळे निर्माम झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. दरम्यान, कोरोनाबाबत होत असलेल्या संशोधनामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.

आता समोर आलेल्या नव्या संशोधनानुसार डेंग्यूचा ताप आणि कोरोना विषाणूमुळे येणारा ताप यांच्यात परस्पर संबंध असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार ज्या व्यक्तींना एकदा डेंग्यूचा ताप येऊन गेला आहे, अशा व्यक्तींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे, जी कोरोना विषाणूशी लढण्यास मदत करते. याबाबत अधिक समजावून सांगण्यासाठी संशोधकांनी ब्राझीलचे उदाहरण दिले आहे, तिथे गतवर्षी डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला होता.

हे संशोधन ड्युक विद्यापीठाचे प्राध्यापक मिगुएल निकोलेलिस यांनी केले आहे. निकोलेलिस यांनी रॉयटर्सला सांगितले की, काही ठिकाणी २०१९ आणि २०२० मध्ये पसरलेला कोरोना यांच्यात एक संबंध आहे. ज्या ठिकाणी गेल्या वर्षी डेंग्यूचा फैलाव झाला होता तिथे कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होता. तसेच संसर्ग फार कमी वेगाने होत होता.

डेंग्यूचा फ्लेविव्हायरस सेरोटाइप आणि SARS-CoV-2 यांच्यात सुप्त संबंध आहे. डेंग्यूच्या विषाणूची अँटीबॉडी कोरोना विषाणूवर काम करते. जर हे योग्य असल्याचे सिद्ध झाले, तर डेंग्यूच्या संसर्गाचा किंवा डेंग्यूची एक सुरक्षित आणि प्रभावी लस कोरोना विषाणूविरोधात काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

निकोलेलिस यांनी सांगितले की, या अभ्यासामधून समोर आलेले निष्कर्ष वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचं कारण म्हणजे आधीच्या अनेक संशोधनामधून ज्यांच्या रक्तात डेंग्यूची अँटीबॉडी आढळून येते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसेल तरी त्यांची कोरोना चाचणी चुकीच्या पद्धतीने पॉझिटिव्ह येत आहे. ही बाब या दोन्ही विषाणूंमध्ये प्रतिरक्षात्मक संबंध असू शकतात, याकडे लक्ष वेधते. या सर्वाची अपेक्षा कुणीही केली नव्हती. त्याचं कारण म्हणजे हे दोनेही विषाणू एकमेकांपासून वेगळे आहेत.

मात्र या दोन्ही विषाणूंमधील परस्पर संबंधांबाबत योग्य पद्धतीने माहिती घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचे निकोलेलिस यांनी सांगितले. निकोलेलिस यांचे हे संशोधन अद्याप प्रकाशित झालेले नाही. मात्र MedRxiv च्या प्रीप्रिंट सर्व्हरवर हे संशोधन परीक्षणासाठी अपलोड करण्यात आले आहे.

या संशोधनामध्ये ब्राझीलच्या ठरावीक लोकसंख्येमध्ये कमी प्रमाणात पसरलेला कोरोना विषाणू आणि डेंग्यूमुळे शरिरात बनलेल्या अँटीबॉडी यामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले आहे. तर ब्राझीलच्या काही भागांत मात्र कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले होते.

गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरुवातील ब्राझीलच्या काही भागात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. त्यामुळे ब्राझीलच्या इतर भागांच्या तुलनेत या भागांमध्ये कोरोनाचा समूह संसर्ग होण्यास बराच वेळ लागला. संशोधकांनी डेंग्यूचे रुग्ण आणि कोविड-१९च्या संथगतीमध्ये परस्पर संबंध असल्याचे दिसून आले.

निकोलेलिस यांनी सांगितले की, या संशोधनामधील निष्कर्ष आश्चर्यकारक होते. विज्ञानामध्ये असेच होते. जर तुम्ही कुठल्याही एका गोष्टीबाबत माहिती घेत असता तेव्हा तुमच्या सामना दुसऱ्या अशा गोष्टीशी होतो ज्याच्याबाबत तुम्ही आधी कल्पनाही केलेली नसते.