Coronavirus: कोरोनापासून वाचण्यासाठी केंद्र सरकारचा ‘डाएट प्लॅन’; इम्युनिटी वाढवणाऱ्या पदार्थांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:31 PM2021-05-09T17:31:19+5:302021-05-09T17:36:16+5:30

Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून या अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. अशात कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचे आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. यात संक्रमण वेगाने पसरत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी लोकं विविध उपाय घरगुतीपद्धतीने करत आहेत.

कोरोना महामारीत आरोग्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. याबाबत जनजागरुकताही होऊ लागली आहे. या धोकादायक लाटेतून सुरक्षित राहण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचे आहे. साथीच्या काळात चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे.

कोणताही आजार होऊ नये आणि कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी निरोगी आणि तंदुरस्त ठेवणारा आहार घेणं गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही पदार्थांची यादी तयार करत ती नागरिकांना शेअर केली आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात तुमच्या शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

जे रुग्ण कोविडमधून बरे झालेत त्यांनी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढवावी. केंद्र सरकारकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर काही पदार्थांची यादी टाकण्यात आली आहे. या यादीत नेमके कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण जाणून घेऊया

कोरोना काळात डार्क चॉकलेट, हळदीचं दूध, प्रोटिन पदार्थ असा काही बेसिक डाएट प्लॅन सुचवला आहे. त्याचे पालन केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती आणि स्नायूंची शक्ती, ऊर्जा वाचवण्यात मदत होत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

कोविड रुग्णांनी मुख्यत: स्नायू आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी नाचणी, ओट्स, अमरनाथ यासारख्या धान्याचा वापर आहारात करायला हवा. कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया नट, चीज यासारखे पदार्थ खाल्ल्यानेही प्रोटीन मिळतं.

त्याचसोबत बदाम, आक्रोड, मोहरी तेल, ऑलिव्ह ऑईल यासारख्या गोष्टीचा वापर करावा. नियमित शारिरीक हालचाल, योग आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. चिंतामुक्त होण्यासाठी ७० टक्के कोको प्रमाण असलेले डार्क चॉकलेट खावं.

शरीरासाठी आवश्यक विटामिन घेण्यासाठी ताजी फळं, लिंबू, लाल पपई, नारंगी रंगाची संत्री इत्यादी रोजच्या आहारात समाविष्ट केले जावे. दिवसातून एकदा हळदीचं दूध प्या. आहारात आंबा पावडरचा समावेश करणंही गरजेचे आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांना चव, गंध न येण्यासोबत जेवण खातानाही त्रास होतो. अशावेळी काही मऊ पदार्थ खावेत. कोरोनापासून वाचण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार करावा. यात चिकन, मासे, पनीर, सोयाबीन हेदेखील फायदेशीर ठरेल

नियमितपणे व्यायाम केल्याने आपण तणावमुक्त राहाल. अक्रोड, बदाम, ऑलिव्ह आणि मोहरीचे तेल घेणे देखील फायदेशीर मानले जाते