खुशखबर! अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीची कोरोना लस 'या' वयोगटातील लोकांवर ठरली प्रभावी

By manali.bagul | Published: October 1, 2020 04:44 PM2020-10-01T16:44:06+5:302020-10-01T17:45:41+5:30

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांमध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या संक्रमणामुळे झाला आहे. मृतांमध्ये गंभीर आजारांनी पिडीत असलेले, वयस्कर लोक, लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक यांचे प्रमाण जास्त आहे दरम्यान कोरोना लसीबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एलेर्जी आणि इंफेक्शियस डिसिजेस (NIAID) आणि अमेरिकेतील बायोटेक कंपनी मॉडर्नाच्या संशोधकांनी मिळून एक लस विकसित केली आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील ट्रायलला सध्या सुरूवात झालेली आहे. या लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून यांमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आली आहे.

'न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार प्रयोगिक लस mRNA-1273 ला परिक्षणाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. NIAID च्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्धांवर कोरोनाची चाचणी केल्यानंतर धोका वाढण्याची शक्यता असते.

पण या लसीचे लसीकरण महत्वपूर्ण ठरले आहे. कारण यामुळे वयोवृद्ध लोकांवर चांगले परिणाम दिसून आले आहेत. सुरक्षा आणि परिणामकारकता यामुळे ही लस वयोवृद्ध लोकांसाठी प्रभावशाली ठरली आहे.

या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा 16 मार्च 2020 रोजी सुरू झाला आणि नंतर वृद्धांची नोंदणी करण्यासाठी सुमारे एक महिन्याची वाढ करण्यात आली. तज्ज्ञांनी सांगितले की या चाचणीअंतर्गत ४० निरोगी स्वयंसेवकांची नोंद झाली. यापैकी 20 लोकांचे वय 56 ते 70 होते. तर इतर 20 लोकांचे वय 71 किंवा त्याहून अधिक होते.

संशोधकांना दिसून आले की, या वयोगटातील स्वयंसेवकांवर या लशीचे अधिक चांगले परिणाम दिसून आले. काही जणांना लसीकरणानंतर ताप किंवा थकवा जाणवला होता.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांना लस दिली गेली त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती चांगली दिसून आली होती.