कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये; शास्त्रज्ञांचे म्हणणे काय? वाचा

By देवेश फडके | Published: January 16, 2021 04:04 PM2021-01-16T16:04:24+5:302021-01-16T16:12:43+5:30

जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी आपापली मते मांडली आहेत. नेमके काय म्हणतात शास्त्रज्ञ? जाणून घेऊया...

बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानाचा प्रारंभ केला. मात्र, लसीकरण मोहिमेनंतर कोरोना आटोक्यात येईल, असे नाही. त्यामुळे कोरोना लस घेतल्यानंतरही काही गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी आपली मते मांडली आहेत.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लस टोचून घेतल्यानंतरही आपल्याला मास्क घालण्यासह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी शास्त्रज्ञांकडून अनेक कारणे सांगण्यात आली आहेत. लस दिल्यानंतर कोरोना संसर्गापासून सुरक्षित झाल्याची खात्री दिली जाऊ शकत नाही. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात येणार की नाही, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

कोरोना लसीकरणानंतर जीवन पूर्ववत करण्याची अजिबात घाई करू नये. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर याचा आढावा घेतला जाईल. मात्र, सकारात्मक बदलासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, असे न्यरोइकोनॉमिस्ट उमा करमरकर यांनी सांगितले.

देशभरातील काही नागरिकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. मात्र, अन्य देशवासीयांना लस दिली गेली नसल्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस आणि अन्य कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले जात आहे.

जॉन हॉपकिन्समधील वरिष्ठ अभ्यासक असलेले डॉ. अमेश अदालजा यांनी सांगितले की, लसीकरणाचे दोन डोस हे कोरोनामुक्त झाल्याची हमी देत नाही. तसेच यामुळे कोरोना संसर्गाचे पसरणार नाही, याची अद्याप शाश्वती दिली गेलेली नाही. यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना लसीकरणानंतरही मास्क घालणे आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळावी. हे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मधुमेह, ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, तेव्हाच जीवन सामान्य होऊ शकेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यानंतर संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, बहुतांश व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच हा बदल होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोना निर्बंधातून मुक्तता होऊ शकते, असा दावा काही जाणकारांकडून केला जात आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर मोकळेपणाने संचार करणे. अधिक लोकांमध्ये मिसळणे. सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने फिरणे धोकादायक ठरू शकते. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पडत नाही, तोपर्यंत सर्वांनीच खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचेही शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.