Corona Vaccination: कोरोना लस घ्यायलाच हवी; फक्त पहिल्या डोसनंतर 'ही' काळजी नक्की घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:07 PM2021-05-09T21:07:00+5:302021-05-10T20:56:06+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिल महिन्यात देशात पहिल्यांदाच दिवसभरात १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. महिना संपेपर्यंत हा आकडा ४ लाखांच्या जवळ पोहोचला.

मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरुच आहे. सध्या दररोज कोरोनाच्या ४ लाख रुग्णांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या होतात. त्यांची प्रकृती कोरोनाची लस न घेतलेल्या व्यक्तींइतकी खालावत नाही. मात्र कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्ती इतरांसाठी धोकादायक ठरत आहेत.

कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते. मात्र या व्यक्ती इतरांसाठी सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी भीती डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. मात्र डॉक्टरांना याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. डॉक्टरांना जास्त काळजी लस न घेतलेल्या व्यक्तींची वाटते. कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींपासून इतरांना अधिक धोका असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. यापैकी बहुतांश जण कोरोना लस न घेतलेले आहेत. या व्यक्तींना कोरोनाची लागण कशी झाली याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र कोरोनाची लागण झालेल्या, पण लक्षणं नसलेल्या कुटुंबियांकडून त्यांना कोरोनाची बाधा झाली असावी, असा डॉक्टरांना अंदाज आहे.

कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होण्यासाठी जवळपास सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. या अवधीत संबंधित व्यक्ती संक्रमणासाठी अतिसंवेदनशील असतात, अशी माहिती पियरलेस हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक शुभ्रोज्योति भौमिक यांनी दिली.

विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास अगदीच सौम्य लक्षणं दिसून येतात. सुरुवातीला अनेक दिवस ही लक्षणं दिसूनच येत नाहीत. या कालावधीत या व्यक्तींच्या माध्यमातून कोरोनाची लस न घेतलेल्यांना कोरोनाची लागण होते.

कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही, आपण पूर्णपणे सुरक्षित झालो, अशी काहींची समजूत आहे. मात्र कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं गरजेचं असल्याचं स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे क्लिनिकल फार्मोकोलॉजीचे माजी अध्यक्ष शंतनू त्रिपाठी यांनी सांगितलं.

लस कोरोनाचा प्रादुर्भाव थेट रोखत नाही. ती केवळ व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संक्रमणाचा वेग कमी करते, असं त्रिपाठी म्हणाले. कोरोनाची लस घेतल्यावर व्यक्ती सुरक्षित होते. मात्र तिच्या आसपासच्या व्यक्ती सुरक्षित होत नाहीत, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.