विराटच्या वार्षिक कमाईपेक्षा पाचपट लिओनेल मेस्सी कमावणार; बार्सिलोना सोडल्यानंतर जम्बो लॉटरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:35 IST2021-08-10T17:30:42+5:302021-08-10T17:35:42+5:30

#MessiPSG : २००३ साली वयाच्या १६ वर्षी बार्सिलोना क्लबकडून लिओनेल मेस्सीनं पदार्पण केलं... ७७८ सामन्यांत ६७२ गोल्स करून दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा एकाच क्लबकडून सर्वाधिक ( ६४३ गोल्स, सँटोस क्लब) गोल्स करण्याचा विक्रम मेस्सीनं मोडला..
ला लिगा स्पर्धेच्या ८ हंगामात व चॅम्पियन्स लीगच्या ६ हंगामात सर्वाधिक गोल्सचा विक्रम.. चार चॅम्पियन्स लीग, १० ला लिगा यासह ३४ प्रमुख स्पर्धा जिंकण्याचा विक्रम... सलग चार असे एकूण सहा बॅलोन डी ओर पुरस्कार...
ला लिगामध्ये सर्वाधिक ४७४ गोल्स... असे अनेक विक्रम मेस्सीनं बार्सिलोनासोबतच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत केले... रविवारी झालेल्या निरोप समारंभात मेस्सी ढसाढसा रडलेला सर्वांना पाहिला...
बार्सिलोनासोबत करारावरून वाद एवढा टोकाला जाईल याचा विचारही त्यानं कधी केला नसावा... त्यामुळेच ५० टक्के पगार कपात करण्याची तयारी दाखवूनही मेस्सीला क्लबने नकारच दिला.
भावनिक मुद्दा सोडला, तर मेस्सीला बार्सिलोना सोडणं काही तोट्याचे जाणार नाही. मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain ) क्लबकडून खेळताना दिसेल आणि दोन वर्षांच्या करारासाठी त्याल बक्कळ पैसाही दिला जाणार आहे.
मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांनीही लिओ PSG कडून खेळणार या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
३४ वर्षीय मेस्सीनं रविवारी निरोपाच्या भाषणात तसे संकेत दिले होते. त्याला PSG २०२३ पर्यंत करारबद्ध करणार असून प्रतीवर्षी ३० मिलियन युरो म्हणजेच ३०९ कोटी रुपये त्याला मिळणार आहेत.
विराट कोहली वर्षाला ६० कोटी कमावतो आणि त्याच्या पाचपट मेस्सी PSG कडून घेणार आहे.