केरळमध्ये दिएगो मॅरेडोनांच्या स्मरणार्थ म्युझियम उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 09:07 PM2020-12-07T21:07:24+5:302020-12-07T21:43:01+5:30

गेल्या महिन्यात अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर दिएगो मॅरेडोना यांचे नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झाले होते.

निधनाच्या काही दिवसांपूर्वीच मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली होती. यातून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना ११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी हलविण्यात आले होते. मात्र, राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे २५ नोव्हेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या दिग्गज फुटबॉलरच्या स्मरणार्थ आता केरळमधील एका व्यावसायिकाने संग्रहालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केरळमधील या व्यावसायिकाने सोमवारी सांगितले की, दिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ एक जागतिक दर्जाचे संग्रहालय बांधण्यात येईल. ज्यामध्ये या अर्जेटिनाच्या दिग्गज फुटबॉलपटूची सोन्याची मूर्ती मुख्य आकर्षण असेल.

मॅराडोना यांचा हा पुतळा 'द हँड ऑफ गॉड'चे प्रतिनिधित्व करेल. अर्जेंटिनाच्या या महान खेळाडूने 1986 च्या फिफा विश्वचषकामध्ये आपल्या एका महत्वपूर्ण गोलला 'द हँड ऑफ गॉड' नाव दिले होते. तसेच, त्यांच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने हा विश्वचषक जिंकला होता, असे बॉबी चेम्मानूर इंटरनॅशनल ग्रुपचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर बॉबी चेम्मानूर यांनी सांगितले.

बॉबी चेम्मानूर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रस्तावित संग्रहालय कोलकाता किंवा दक्षिण भारतात बांधले जाईल. यामध्ये मॅराडोना यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची झलक असणार आहे.

मॅरेडोना यांनी वयाच्या १६ व्या वर्षी फुटबॉल करिअरची सुरुवात अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघाद्वारे केली. लवकरच ते फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये सहभागी झाले. १९८६ चा फिफा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द जितकी शानदार तितकीच वादग्रस्त देखील ठरली.

मॅरेडोना यांनी बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इंग्लंडविरुद्ध १९८६ साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉलविश्व कधीही विसरू शकणार नाही. याच गोलला 'द हँड ऑफ गॉड' असे संबोधले जाते.

अनेक वर्षानंतर त्यांनी हेतूपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. त्याच सामन्यात त्यांनी चार मिनिटानंतर सुरेख गोल नोंदविला होता. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते.