Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:13 PM2020-04-04T12:13:28+5:302020-04-04T12:18:14+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, चॅम्पियन्स लीग, सीरि ए इटालियन लीग आदी महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

इंडिंयन प्रीमिअर लीग ( आयपीएल) 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असली तरी एप्रिल-मे मध्ये ती खेळवण्यात येईल याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पर्यायाची चाचपणी सुरू आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एक वर्षानं पुढे ढकलण्यात आली असून ती 2021मध्ये जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धाही होतील.

या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) याबाबत महत्त्वाची बैठकही बोलावली होती आणि त्यावर याविषयी चर्चा झाल्याचे कळते.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पण, त्यावर अनिश्चिततेचं सावट आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द झाल्यात ती थेट 2022मध्ये घेण्यात येईल असा प्रस्तावही समोर आला आहे, कारण 2021च्या स्पर्धेचं यजमानपद भारताला देण्यात आले आहे.

त्यात शनिवारी एक मोठी बातमी समोर आली.

भारतात येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी 17 वर्षांखालील मुलींची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली येऊन नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

युरो 2020 आणि टोक्यो ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यामुळे आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही संकट आले आहे.