'सिंघम'मधील शिवाची सिनेमाच्या सेटवर फुलली लव्हस्टोरी, अभिनेत्याची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 07:00 IST2023-08-08T07:00:00+5:302023-08-08T07:00:00+5:30

Ashok Samarth : हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत कमी वेळात नावाजलेलं नाव म्हणजे अशोक समर्थ. त्यांची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत कमी वेळात नावाजलेलं नाव म्हणजे अशोक समर्थ. बारामतीमध्ये जन्माला आलेले अशोक समर्थ यांचे बालपणापासूनच अभिनेता बनण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न मेहनतीच्या जोरावर सत्यात उतरवलं.

शालेय शिक्षण बारामतीत पूर्ण झाले आणि पदवीच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. तिथे पदवीचं शिक्षण सुरू असताना अनेक नाट्य संस्थांशी संबंध आला. नाटकात काम केले. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. लक्ष मालिकेत एसीपी अभय किर्तीकरच्या भूमिकेतून ते घराघरात पोहचले.

२००५ साली इंसान चित्रपटातून अशोक समर्थ यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी निगेहबानः द थर्ड आयमध्ये काम केले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. एक चालीस की लास्ट लोकल, वीर, आया सावन झुमके आणि क्रांतीवीर सारख्या सिनेमात त्यांनी काम केले.

सिनेजगतात कार्यरत असताना त्यांची रोहित शेट्टीसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांना सिंघम सिनेमात काम मिळाले. यातील त्यांनी साकारलेली शिवाची भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर रावडी राठोड, अचल रहे सुहाग, गली गली चोर है, मॅरीज टू अमेरिका या सिनेमातही काम केले आहे.

मराठीत वावटळ, मरेपर्यंत फाशी, थोडं तुझं थोडं माझं, विटी दांडू, बेधडक, दंडीत आणि अनेक मराठी चित्रपटात काम केले. रोहित शेट्टीच्या सिंबामध्येही अशोक समर्थ वकीलाच्या भूमिकेत दिसले होते.

अशोक समर्थ यांची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१३ साली आलेला चित्रपट ट्रॅफिक जॅममध्ये त्याची ओळख अभिनेत्री शीतल पाठक बरोबर झाली. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत होते. एकत्र काम करता करता त्यांच्यात पक्की मैत्री झाली. त्यानंतर याच मैत्रीला त्यांनी प्रेमाचे नाव जोडले आणि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

मिलिंद गवळी यांच्यासोबत कृपासिंधू मधून शीतल पाठक नावारुपाला आली. त्यानंतर तिने मंडळी तुमच्यासाठी कायपण, चेहरा, गाव माझं तंटामुक्त, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य, बाय गो बाय अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत ती झळकली आहे.

दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने आपणही एखादा चित्रपट दिग्दर्शित करावा अशी त्यांची इच्छा होती. आता त्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण जननी या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ करताना दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले असून या दोघांसह त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.