फक्त १६ वर्षांच्या वयात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनसोबत केलेलं काम; ५३ वर्षांचा अभिनय प्रवास अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:34 IST2025-08-17T12:05:37+5:302025-08-17T12:34:20+5:30

५३ वर्षांची अभिनय कारकीर्द आणि २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर!

Actress Jyoti Chandekar Passes Away: तेजस्विनी पंडितची (Tejaswini Pandit ) आई आणि प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून ज्योती चांदेकर महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून ओळख निर्माण झालेल्या 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी साकारलेल्या पूर्णा आजीच्या भूमिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. 'ठरलं तर मग' ही त्यांच्या कारकीर्दीतील शेवटची मालिका ठरली.

ज्योती चांदेकर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनुभवी कलाकारांपैकी एक आहेत. केवळ १२ वर्षांच्या वयात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती.

ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनसोबतही काम केलेलं. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या बी आर इशारा दिग्दर्शित 'एक नजर' या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका केली होती. त्यावेळी त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या.

ज्योती चांदेकर या वडिलांसोबत 'एक नजर' या चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा दिग्दर्शकाने दिलेल्या काही ओळी सहजगत्या वाचल्यानंतर त्यांना थेट चित्रपटात घेण्यात आलं होतं. त्याच्या पुढच्याच वर्षी पुण्यात दिग्दर्शक अनंत ओक यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकासाठी त्यांना निवडलं.

ज्योती चांदेकर यांनी 'सुंदर मी होणार', 'करायला गेलो एक', 'वऱ्हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'रखेली', 'राजकारण गेलं चुलीत', 'कथा अकलेच्या कांद्याची' यांसारख्या नाटकांमध्येही काम केलंय. डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत 'मित्र' या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका लक्षणीय ठरली होती.

नाटकांशिवाय ज्योती चांदेकर यांनी 'गुरू', 'ढोलकी', 'तिचा उंबरठा', 'पाऊलवाट', 'सलाम', 'सांजपर्व' अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील 'तू सौभाग्यवती हो', 'छत्रीवाली' या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी 'मी सिंधुताई सपकाळ' आणि 'तिचा उंबरठा' या चित्रपटांदरम्यान एकत्र काम केलं होतं. 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात दोघींनीही सिंधुताईंच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचे चित्रण साकारले होते. तर 'तिचा उंबरठा' या चित्रपटात ज्योती यांनी तेजस्विनीच्या सासूची भूमिका साकारली होती. या दोघींना २०१५च्या झी गौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी 'मी सिंधुताई सपकाळ' आणि 'तिचा उंबरठा' या चित्रपटांदरम्यान एकत्र काम केलं होतं. 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात दोघींनीही सिंधुताईंच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचे चित्रण साकारले होते. तर 'तिचा उंबरठा' या चित्रपटात ज्योती यांनी तेजस्विनीच्या सासूची भूमिका साकारली होती. या दोघींना २०१५च्या झी गौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.