आमिर खानची डोकेदुखी वाढणार? सोशलवर 'सितारे जमीं पर'विरोधात ट्रेंड; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:44 IST2025-05-15T17:27:46+5:302025-05-15T17:44:49+5:30
आमिर खानच्या 'सितारे जमीं पर' चित्रपटावर 'बॉयकॉट'ची मोहिम सुरु झाली आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला असला तरी भारतीय सैन्यासोबच भारतीय नागरिक हे सतर्क झाले आहेत.
भारत-पाकिस्तान संघर्षात तुर्कस्थानच्या भूमिकेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. तुर्कस्थानने पाकिस्तानला ड्रोनच्या स्वरूपात दिलेल्या मदतीनंतर भारतीयांनी 'राष्ट्रप्रथम' म्हणत तुर्कस्थानसोबतचे व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा अप्रत्यक्ष फटका आता अभिनेता आमिर खान याच्यावरही बसताना दिसतोय. आमिर खानच्या 'सितारे जमीं पर' या सिनेमाविरोधात 'बॉयकॉट'ची मोहिम सुरु झाली आहे.
याच कारण ठरली आहे आमिर खान आणि तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट. आमिर खानने तुर्कीमध्ये लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे शूटिंग केलं होतं. यावेळी, सुपरस्टारने तिथल्या फर्स्ट लेडीची भेट घेतली होती.
१५ ऑगस्ट २०२० रोजी आमिर खानने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या पत्नी एमिने एर्दोगान यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला आपल्या वॉटर फाउंडेशनसारख्या सामाजिक प्रकल्पांबद्दल माहिती दिली होती.
तर २०१७ मध्ये आमिर खानने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या भेटीचे कारण उघड झाले नव्हते.
दरम्यान, आमिरचा हा 'सितारे जमीं पर' चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.