Sameer Wankhede Case: NCB चे 'दिल्लीश्वर' येण्याआधीच मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमध्ये; समीर वानखेडेंविरोधात चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:31 PM2021-10-27T12:31:56+5:302021-10-27T12:47:33+5:30

आर्यन खानच्या (Aryan Khan) मुंबई क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणाने गेल्या रविवारी वेगळेच वळण घेतले आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. याचबरोबर आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा पंच प्रभाकरने वानखेडेंवर खंडणी उकळल्याचे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता हा हाय व्होल्टेज प्रकरण समीर वानखेडेंवरच उलटण्याची शक्यता आहे.

साक्षीदार प्रभाकर सैल याने आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली होती, असा आरोप केला आहे. यापैकी 8 कोटी रुपये हे समीर वानखेडेंना दिले जाणार होते, असे त्याने म्हणत काही व्हिडीओ देखील जारी केले आहेत. यामुळे एनसीबीच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने एनसीबीने समीर वानखेडेंना दिल्लाला पाचारण केले होते.

मंगळवारी वानखेडे दिल्लीला गेले होते. यानंतर एनसीबीने तीन जणांची टीम तयार करून मुंबईला चौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ही टीम आज सकाळी 11 वाजता मुंबईत आली आहे. मात्र, त्या आधीच मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरु केल्याने वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांच्या वकील सुधा द्विवेदी (Sudha Dwivedi) यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडेंसह (Sameer Wankhede) अन्य पाच जणांविरोधात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथितरित्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल करण्याची तक्रार दाखल केली होती. यानुसार मुंबई पोलिसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली होती.

मंगळवारी रात्रीच प्रभाकरचा जबाब कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करण्यात आला. डीसीपी स्तरावकील अधिकाऱ्याने हा जबाब घेतला आहे. यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आधी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करणार आहे.

प्रभाकर सैलने आपल्या आरोपांमध्ये ज्या लोकांची नावे घेतली आहे, ज्या जागांचा उल्लेख केला आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज काढले जाईल. याशिवाय प्रभाकरच्या लोकेशनची तपासणी केली जाणार आहे.

प्रभाकरने ज्या ठिकाणी पैशांची देवाण घेवाण झाल्याचा दावा केला तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. यानंतर एक रिपोर्ट दाखल केला जाणार आहे व यानंतर गुन्हा दाखल करायचा की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.

दुसरीकडे एनसीबीची टीमदेखील मुंबईत पोहोचत आहे. या टीमचे नेतृत्व डीडीजी ज्ञानेश्वर सिंह करत आहेत. समीर वानखेडेंवर 25 कोटी रुपये वसूल करण्याचे आरोप लागले आहेत, त्याची चौकशी केली जाणार आहे. यासाठी ही टीम प्रभाकरची देखील चौकशी करणार आहे.

सकाळी 11 वाजता एनसीबीची टीम मुंबई विमानतळावर पोहोचली होती. एका गेस्ट हाऊसमध्ये एक कॅम्प ऑफिस बनविण्यात आले आहे. याच ठिकाणी कारवाई होणार आहे.

ही टीम मुंबईच्या एनसीबी ऑफिसमध्येही जाणार आहे. यानंतर कॅम्प ऑफिसमध्ये सर्व संबंधीत लोकांची चौकशी केली जाणार आहे. या लोकांचे जबाब एनसीबीची टीम नोंदवून घेणार आहे.

Read in English