Ananya Panday: 'हे काय प्रोडक्शन हाऊस नाही, NCB कार्यालय आहे', समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला खडसावलं, नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:03 AM2021-10-23T11:03:03+5:302021-10-23T11:09:30+5:30

Ananya Panday Latest News: आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता बॉलीवूडची उद्योन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे हिचीही एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. अनन्या पांडेच्या चौकशीत नेमकं काय घडलं? एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे अनन्यावर का संतापले? जाणून घ्या Inside Story

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या चौकशीदरम्यान अनेक नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. आर्यन खानच्या मोबाइल चॅट्समध्ये ड्रग्जच्या खरेदीबाबतची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्यानुसारच एनसीबीचे अधिकारी आता वेगानं तपासाला लागले आहेत.

आर्यन खानच्या चॅट्समध्ये एका उद्योन्मुख अभिनेत्रीसोबतच्या चॅट्सची माहिती समोर आली होती. ती अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचं आता निष्पन्न झालं आहे. एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेच्या घरी पोहोचून आवश्यक कागदपत्रांसोबतच तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करुन घेऊन गेले. तसंच तिलाही चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं.

अनन्या पांडेला गुरूवारी दुपारी दोन वाजता एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं. पण ती कार्यालयात चार वाजता पोहोचली होती. त्यानंतर तिच्या चौकशीत समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं अनन्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ११ वाजता एनसीबीनं कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं.

अनन्याला शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलेलं होतं. पण ती दुपारी दोन वाजता पोहोचली. त्यामुळे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. अनन्याची चौकशी वेळ 11 वाजता होती. त्यामुळे चौकशी अधिकारी अगोदरच ऑफिसमध्ये आले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास अनन्याने वाट पाहायला लावली.

एनसीबी अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या अनन्या पांडेचा झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी चांगलाच समाचार घेतला. "तुला 11 वाजता बोलावलं होतं, तू दोन वाजता कशी काय येऊ शकतेस? प्रोडक्शन हाऊस समजलीस काय, पण हे NCB कार्यालय आहे, हे लक्षात ठेव", अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्याला खडसावलं.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी अनन्याची कसून चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दोघं गांजा खरेदीबद्दल बोलत होते, असं संशय एनसीबीला आहे. 'काही जुगाड होऊ शकतो का?', असं आर्यन खान अनन्या पांडे हिला विचारत होता. त्यावर अनन्यानं 'मी व्यवस्था करते', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले. "मी फक्त विनोद करत होते" असं उत्तर अनन्यानं त्यावर दिलं. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही.

दरम्यान, अनन्या आणि आर्यन यांच्यात एकदा नव्हे, तर अनेकदा ड्रग्ज संदर्भात संभाषण झाल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच तिची चौकशी करणं गरजेचं असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. अनन्यानं आर्यनसाठी ड्रग्जची व्यवस्था केली होती असे कोणतेही पुरावे सध्या सापडलेले नाहीत. पण दोघांमध्ये ड्रग्जबाबत बऱ्याचदा संभाषण झालं आहे, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांनी अनन्या भांबावून गेली होती. चौकशीला सामोरं जाताना तिला रडू कोसळलं होतं. सलग दोन तासांच्या चौकशीनंतर अनन्या तणावाखाली आली होती. त्यामुळेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारची चौकशी थांबवून तिला शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं.