Aryan Khan Drugs Case: आर्यन खान एवढ्या वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज घेतोय; NCB ने पुरावे दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:51 PM2021-10-14T16:51:07+5:302021-10-14T16:57:20+5:30

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: एनसीबीने सर्व आरोपींचे मोबाईल फोन तपासले आहेत. यामध्ये आर्यन आणि अरबाज हे अनेक ड्रग पेडलरांच्या संपर्कात होते. एनसीबीने याचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

मुंबई क्रूझ रेव्ह पार्टी (mumbai cruise rave party) प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) पुरता अडकला आहे. त्याच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी सुरु झाली तेव्हा एनसीबीने त्यास जोरदार विरोध केला. आर्यन खान आज नाही तर वयाच्या विसाव्या वर्षापासून ड्रग्ज घेतोय, असा धक्कादायक खुलासा एनसीबीने कोर्टासमोर केल्याने खळबळ उडाली आहे.

आर्यनच्या वकिलांनी त्याला जामिन मिळविण्यासाठी युक्तीवाद सुरु केला. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्यन बोटीवर नव्हता, त्याच्याकडे ड्रग्जही सापडले नाही, मग अटक कशाला असा होता. (Aryan Khan bail Plea.)

यावर एनसीबीने आज मोठमोठे खुलासे केले आहेत. सरकारी वकिलांनी आर्यनच्या जामिनाला विरोध करत आर्यन खान गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला आहे. जरी त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नसले तरी तो अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेतो आणि ड्रग पेडलरांच्या संपर्कात असतो.

क्रूझ शिपवरून जे ड्रग्ज जप्त करण्यात आले ते काही फक्त अरबाज मर्चंटसाठी नव्हते तर आर्यन खानसाठी देखील होते. आर्यन खान ते घेणार होता, असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

चौकशीवेळी आर्यन खानने आधीच तो अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचे कबुल केले आहे. आर्यन खान गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे, असे त्याने एनसीबीला सांगितले. याचाच अर्थ आर्यन खानने 20 वर्षांच्या असताना ड्रग्जच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे.

आर्यन खानने केवळ भारतातच नाही तर परदेशांमध्ये युके, दुबई आणि अन्य देशांमध्ये ड्रग्ज घेतले आहे. तो नेहमी त्याचा 15 वर्षांपासूनचा मित्र अरबाजसोबत ड्रग्ज घेतो. अरबाज हा एसीबीने रेड टाकली तेव्हा देखील आर्यन सोबत होता. त्याच्याकडून 6 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. क्रूझ समुद्रात प्रवासावर जाताच हे दोघे तिथे ते ड्रग्ज घेणार होते, असा दावा एनसीबीने केला आहे.

एनसीबीने सर्व आरोपींचे मोबाईल फोन तपासले आहेत. यामध्ये आर्यन आणि अरबाज हे अनेक ड्रग पेडलरांच्या संपर्कात होते. एनसीबीने याचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. यामुळेच आधीही कोर्टाने आर्यनचा जामिन फेटाळला आहे.

आज सेशन कोर्टानेही आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर २० ऑक्टोबरला निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणी पूर्ण केल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

Read in English