धक्कादायक! न्यायाधीशासह मुलावर विषप्रयोग; समस्या सोडवण्यासाठी दिलेली 'सामग्री' जीवघेणी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:05 PM2020-07-30T18:05:49+5:302020-07-30T18:22:42+5:30

न्यायाधीशासह मुलावर विषप्रयोग झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेसह तांत्रिकाचा समावेश आहे.

न्यायाधीश आणि मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालातून विषप्रयोगाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र कुमार त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबावर विषप्रयोग करण्यात आला. त्यात त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

अन्नातून विषबाधा झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला वाटत होती. मात्र शवविच्छेदन अहवालातून विषप्रयोग झाल्याची माहिती पुढे आल्यानं पोलिसांना धक्का बसला. त्यानंतर रेवा आणि छिंदवाडामधून पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती बेतूलचे पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी दिली.

न्यायाधीश त्रिपाठी यांच्या कुटुंबाला काही समस्या भेडसावत होत्या. त्या दूर करण्यासाठी एक महिला त्यांना मदत करत असल्याची माहिती तपासातून पुढे आली.

महिलेच्या सांगण्यावरून त्रिपाठी काही तांत्रिक विधी करत होते. एक तांत्रिक यामध्ये त्यांना मदत करत होता. तांत्रिक विधी केल्यानंतर सर्व समस्या दूर होतील, असं आश्वासन संबंधित महिलेनं दिलं होतं.

महिलेनं काही सामग्री न्यायाधीशांना पाठवली होती. पिठात कालवून त्यापासून तयार केलेला पदार्थ खाण्याचा सल्ला त्या महिलेनं त्रिपाठी यांना दिला होता.

महिलेनं दिलेल्या सामग्रीमध्ये विष होतं. ते पिठात कालवण्यात आल्यानं त्यापासून तयार करण्यात आलेल्या पोळ्या खाऊन त्रिपाठी आणि त्यांच्या दोन मुलांची प्रकृती बिघडली. २० जुलैला हा प्रकार घडला. त्यानंतर ते पीठ प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं.

उपचारादरम्यान त्रिपाठी आणि त्यांच्या मोठ्या मुलाची प्रकृती बिघडली. त्यांना २४ जुलैला नागपूरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र २६ जुलैला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या एक दिवस आधी त्यांच्या मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी दुसऱ्या मुलाकडे चौकशी केली असता, त्यातून सामग्री देणाऱ्या महिलेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली.