४५ हजार पगार तरीही ५० किलो सोनं, ११ कोटी रोकड अन्...; कॉन्स्टेबल कसा बनला कोट्यधीश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:27 IST2024-12-21T11:14:05+5:302024-12-21T11:27:19+5:30

५० किलो सोनं-चांदी दागिने, कोट्यवधीची रोकड...एक सर्वसामान्य कॉन्स्टेबल त्याच्या सॅलरीतून इतकी कमाई तर करू शकत नाही. मध्य प्रदेशात आणखी एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आले आहे. जिथं ४५-५० हजार पगाराची नोकरी करणारा एक कॉन्स्टेबल अवघ्या काही वर्षात कोट्याधीश बनतो.
लोकायुक्त आणि इन्कम टॅक्स विभागाने माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरश शर्माच्या घरी धाड टाकून ३ कोटींची रोकड आणि २ कोटी किंमतीचे २०० किलो चांदी, १० किलो चांदीचे दागिने, ५० लाखाचे सोने जप्त केले. सौरभ शर्मा सध्या दुबईला आहे. एका पगारदार आरटीओ कॉन्स्टेबलची कोट्यवधीची मोहमाया पाहून अधिकारीही चक्रावले आहेत.
कागदोपत्री तो केवळ कॉन्स्टेबल होता परंतु मंत्री आणि अधिकाऱ्यांचा तो लाडका होता. त्याच्याकडे मध्य प्रदेशातील आरटीओची निम्म्याहून अधिक चेक पोस्टची जबाबदारी होती. या चेक पोस्टवरून जाणाऱ्या मालासोबत त्याचा व्यवहार होता. चेकपोस्टवर तैनात इतर निरीक्षक आणि अधिकाऱ्यांची टक्केवारी तो निश्चित करायचा. त्याच्या कामात कुणीही दखल देत नव्हते.
सौरभने सरकारी चेकपोस्टचे खासगीकरण केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने हे चेकपोस्ट कंत्राटावर दिले होते. प्रत्येक चेक पोस्टवरून दर दिवसासाठी ठराविक रक्कम होती. हे पैसे तो स्वतः चेकपोस्टवरून घेत असे. १ जुलै २०२४ पूर्वी मध्य प्रदेशात एकूण ४७ वाहतूक चेकपोस्ट होत्या त्यापैकी सौरभकडे 23 चेकपोस्टची जबाबदारी होती.
२०१६ ते २०२३ पर्यंत सरकार आणि मंत्री बदलत राहिले, पण सौरभला प्रत्येक सरकारच्या आणि प्रत्येक परिवहन मंत्र्यांच्या बंगल्यावर बिनदिक्कत प्रवेश होता. चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली केली जात होती. त्याच्या अनेक तक्रारी आल्या परंतु सौरभपर्यंत कुणीही चौकशीला पोहचलं नाही.
जेव्हा त्याच्या विरोधात चौकशी सुरू झाली तेव्हा २०२३ मध्ये त्याने राजीनामा दिला. ज्या व्यक्तीविरुद्ध चौकशी सुरू आहे, त्या व्यक्तीचा राजीनामा स्वीकारता येत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही सौरभचा राजीनामा स्वीकारला गेला. राजीनामा दिल्यानंतरही तो मंत्र्यांच्या बंगल्यावर सतत भेट देत होता असं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सौरभच्या ठिकाणांवर लोकायुक्तांची कारवाई सुरू होती, १९ आणि २० डिसेंबरच्या रात्री आयकर विभागाच्या पथकाने मेंदोरीच्या जंगलात एका कारमधून ५२ किलो सोन्याच्या अंगठ्या आणि ११ कोटी रुपये रोख जप्त केले. ही कार चेतन गौर यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. चेतन आणि सौरभ हे दोघे मित्र आहेत असं तपासात पुढे आले आहे.
माजी कॉन्स्टेबलला जवळून ओळखणारे लोक नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात की, तो वाहतूक विभागातील त्याच्या बॉसच्या आशीर्वादाने चेकपोस्टवर दलाली करत असे. बेसुमार संपत्ती त्याने चेकपोस्टवरील बेकायदेशीर वसुलीतून जमवली आहे. त्याच्या जीवनशैलीत आणि इतर गोष्टींमध्ये जेव्हा बदल होऊ लागले, तेव्हा अनेकांचा संशय बळावू लागला. यानंतर त्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.
केवळ ४०-५० हजार रुपये पगारावर काही वर्षे सौरभ शर्माने काम केले आणि वर्षभरापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता. लोकायुक्त पोलिसांनी त्याच्या घरातून ६० किलो चांदी, सुमारे १ कोटी रुपयांचे दागिने आणि ३.२५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. सौरभ शर्मा याच्या घरावर छापा टाकल्यानंतर जेव्हा मीडिया पोहोचली तेव्हा एका माजी कॉन्स्टेबलचे घर इतके आलिशान असू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
एका पॉश अरेरा कॉलनीतील सौरभ शर्माच्या घरातून रोख रकमेव्यतिरिक्त ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि सुमारे ६० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय मालमत्तांशी संबंधित कागदपत्रेही सापडली असून त्यांची तपासणी केली जात आहे. त्याच्या घरात सात नोटा मोजण्याच्या मशिनही सापडल्या.