मुलगी प्रियकराच्या प्रेमात पडली म्हणून जन्मदात्या बापाकडून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:48 PM2020-05-28T16:48:48+5:302020-05-28T16:57:05+5:30

इराण : तेहरानमध्ये घरच्यांचा विरोध असल्यानं प्रेमात असलेली 14 वर्षांची युवती घरातून पळून गेली. त्यानंतर तिच्या वडिलांनी हा राग डोक्यात ठेवून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

त्या मुलीला प्रेमाची एवढी भयंकर शिक्षा तिच्या वडिलांनी दिली की, गळा चिरून तिची हत्या केली. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढा देत असतानाच तेहरानमध्ये हा थरारक ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे.

इराणमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गिलान इथे राहणारी 14 वर्षीय रोमिना अशरफी गेल्या महिन्यात आपल्या 35 वर्षीय प्रियकरासह घरातून पळून गेली आणि तिनं लग्न केलं.

रोमिनाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी रोमिना आणि तिच्या प्रियकराला पकडलं. रोमिनाला वडिलांच्या हवाली केलं. त्यांनंतर वडिलांनी मुलीला घरात कोंडून ठेवलं.

गेल्या आठवड्यात रात्री रोमिना झोपली असताना वडिलांनी तिची गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत वडिलांनी पोलिसांना सरेंडर केलं.

मिळालेल्या माहितीनुसार रोमिनाने वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांना ही माहिती देऊनही पोलिसांनी वडिलांच्या हवाली मुलीला केलं.

मुलीच्या प्रेम प्रकरणाचा राग वडिलांच्या डोक्यात गेला आणि त्यांनी हत्या केली. या संपूर्ण प्रकरणात इराण पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इराणमधील सोशल मीडियावर या विषयावर बराच संताप व्यक्त होत असून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

याप्रकरणी वडिलांना अटक केली तरी 3 वर्ष शिक्षा पूर्ण करून ते पुन्हा सुटू शकतात त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.