बनावट चेक, दुसऱ्याचे खाते, बदमाशाने बँकेतून उडवले तब्बल १ कोटी ७० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 01:03 PM2021-05-29T13:03:28+5:302021-05-29T13:06:59+5:30

Crime News: बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

ही धक्कादायक घटना बिहारमधील सिवनी जिल्ह्यात घडली आहे. या संपूर्ण प्रकरणात तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी बिहारमधील एका कंपनीचे चेक आपल्या खात्यांवर रक्कम वळवण्यासाठी वठवले आणि बँकेने त्यांच्या खात्यात रक्कमही जमा केली. त्यानंतर बिहारमधील पाटलीपुत्र येथील कॅनरा बँकेच्या शाखेने सिवनी शाखेला याची माहिती दिली.

देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या चेकच्या बदल्यात हा व्यवहार झाला तो चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या नंबरचा चेक बिहारमधील शाखेत ठेवलेला असल्याचे उघड झाले. त्यानंतर सिवनी ब्रँचच्या व्यवस्थापकांनी सिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आता या प्रकरणी ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली अशा तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिन्ही आरोपींनी सांगितले की, त्यांना हे चेक एका अनोळखी व्यक्तीवे बँकेत वठवण्यासाठी दिले होते. चेक वठून खात्यात पैसे जमा झाल्यावर ती रक्कम काढून आपल्याला देण्यास त्या व्यक्तीने सांगितले होते. त्याबदल्यात या लोकांना एक टक्का कमिशन मिळाले आहे. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

सिवनी पोलीस ठाण्यातील प्रभारी महादेव नागोतिया यांनी सांगितले की, या प्रकरणात बँक व्यवस्थापकांनी लेखी तक्रार दिली होती. तीन चेकची क्लोनिंग करून १ कोटी ७० लाख रुपये काढण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी कलम ४२०, कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे आमि तीन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

त्यांनी सांगितले की, हे तीन चेक आहेत. यामध्ये कुठल्या अज्ञात व्यक्तीने बँकेत खाते असलेल्या आणि त्यामधून मोठे व्यवहार होतात अशा व्यक्तींना दिले. तसेच हा व्यवहार घडवून आणण्यासाठी या लोकांना कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

त्यानंतर हा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या तिघांकडून ही रक्कम घेऊन त्याबदल्यात त्यांना कमिशन दिले गेले. सध्या या तिघांनाही पोलिसांनी पकडले असून, त्यांची चौकशी केली जात आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.