Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 02:07 PM2021-10-23T14:07:40+5:302021-10-23T14:13:44+5:30

Ananya Panday Deleted Whatsapp Chats: आर्यन खानच्या मोबाईलमधून अनन्याशी करण्यात आलेले चॅट सापडले आहेत. यामध्ये ड्रग्जचा सरळसरळ उल्लेख आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानमुळे (Aryan Khan) बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. दोन दिवसांपासून अनन्या पांडेची सहा सहा तास चौकशी केली जात आहे. आता पुन्हा तिला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे.

आर्यन खानच्या मोबाईलमधून अनन्याशी करण्यात आलेले चॅट सापडले आहेत. यामध्ये ड्रग्जचा सरळसरळ उल्लेख आहे. परंतू अनन्याच्या मोबाईलमध्ये या संबंधीचे चॅट सापडत नसल्याने एनसीबी बुचकळ्यात सापडली आहे.

अनन्या पांडेने अनेक जणांसोबत केलेले चॅट डिलीट केल्याचा संशय एनसीबीला आहे. तसेच तिने आर्यनसोबतचे चॅटदेखील चौकशीला येण्याआधी किंवा आर्यनला अटक केल्यानंतर अडकण्याच्या शक्यतेने डिलीट केल्याचा संशय एनसीबीला आहे.

यामुळे एनसीबीने अनन्याचे दोन मोबाईल फोन, लॅपटॉपसह तिच्या 7 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनन्याचे मोबाईल फोन, लॅपटॉप आदी तपासणीसाठी पाठविले आहेत.

अनन्या हिचे अन्य लोकांशी झालेले मेसेजिंग, अन्य माहिती शोधण्यात येणार आहे. अॅक्ट्रेसने चौकशीला सामोरे जाण्याआधी काही चॅट डिलीट केले असावेत असा या अधिकाऱ्यांना संशय आहे. याचबरोबर तिने काही कॉन्टॅक्ट डिटेलही डिलीट केले आहेत. हे कॉन्टॅक्ट देखील रिकव्हर केले जातील. एनसीबी आता फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहे.

यामुळेच अनन्याला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे. दोन दिवसांत फॉरेन्सिक टीम अहवाल देईल, या अहवालावरच अनन्या पांडेची चौकशी केली जाणार आहे.

गुरुवारी घरी जाऊन अनन्याला चौकशीला येण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्याच दिवशी तिची सव्वा दोन तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे यांनी दोन दिवस मिळून 6 तास अनन्याची चौकशी केली आहे. अनन्याने या चौकशीत ड्रग्ज घेतल्याचे नाकारले आहे. तसेच आर्यनसोबत एक गंमत केल्याचे ती म्हणाली.

एनसीबीकडे आधीपासूनच आर्यन खानचा मोबाईल आहे. यामध्ये आर्यनसोबत अनेक परदेशी नागरिकांसोबत ड्रग्ज संबंधीत बोलणे झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनन्या पांडेसह आर्यन खानची बहीण सुहान खानच्या चॅटवर देखील एनसीबीने नजर ठेवली आहे.

अनन्याने चौकशीत म्हटले की, ड्रग्ज कधी घेतले नाही, मात्र सिगारेट ओढलीय. तसेच अनन्याच्या चॅटमध्ये मी एकदा गांजा ट्राय केल्याचे म्हटले आहे व पुन्हा गांजा ओढायचा आहे, असे म्हटले आहे. तसेच दोघांमध्ये ड्रग पेडलरचे नंबरही शेअर झाले आहेत.