Pertol Pump वर तुम्ही 0.00 पाहत राहता आणि 'असा' लागतो चुना; जाणून कशी टाळाल फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:39 AM2023-07-19T09:39:30+5:302023-07-19T09:57:55+5:30

आपण बहुतेक वेळा पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेलो की फसवणूक होऊ नये म्हणून तिकडे मीटरवर शून्य पाहतो.

जर तुम्ही प्रवासासाठी कार किंवा बाईक (Car-Bike) वापरत असाल, तर पेट्रोल पंपावर रोजची भेट ही ठरलेलीच असते. तुम्ही पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना तुमच्या कार-बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास सांगता आणि ते पेट्रोल डिझेल भरताना तुम्हाला मीटरवर शून्य तपासण्यास सांगतात.

तुम्हीही मीटरवर शून्य पाहता आणि आपल्या वाहनात इंधन पूर्णपणे भरलं गेल्याचं तुम्हाला समाधान मिळतं. पण ही बाब इथेच संपत नाही. तुम्ही फक्त शून्यावर नजर ठेवता. पण तुमची फसवणूक टाळण्यासाठी इतकीशी बाब पुरेशी नाही. थोडंसं सतर्क राहून तुम्ही हे कसं टाळू शकता हे पाहूया.

जर तुम्ही याचा नीट विचार केला तर फसवणूक अशा प्रकारे होते जिकडे तुमचं लक्षही जात नाही. मीटरमध्ये फ्युअल क्वांटीटीच्या सेक्शनमध्ये नाही, तर डेन्सिटीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे.

पेट्रोल पंप मशीनमध्ये असलेलं हे डेन्सीटी मीटर थेट तुमच्या इंधनाच्या शुद्धतेशी संबंधित आहे. हा आकडा सरकारने निश्चित केला आहे. वास्तविक, तुमच्या कार किंवा बाईकमध्ये टाकले जाणारे पेट्रोल किंवा डिझेल पूर्णपणे शुद्ध आहे की नाही याची डेन्सिटी त्यात तपासता येते.

यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही ना हे यावरून दिसून येतं. तुम्ही यावर लक्ष न ठेवल्यास तुमच्या वाहनात भेसळयुक्त इंधन टाकले जाण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा पैसा तर वाया जाईलच पण तुमच्या वाहनाच्या इंजिनचंही नुकसान होईल.

डेन्सिटीसाठी निश्चित केलेल्या मानकांशी छेडछाड करून फसवणूक केली जाते. स्पष्ट शब्दात डेन्सिटीला समजून घ्यायचं झाल्यास ते घनता दर्शवते. ठराविक प्रमाणात घटक मिसळून पदार्थ तयार केल्यावर त्याच्या आधारे त्या पदार्थाचा दर्जा ठरवला जातो, त्यात थोडीफार तफावत आढळल्यास त्यात भेसळ झाल्याचं समजतं.

पेट्रोलची घनता ७३० ते ८०० किलो प्रति क्युबिक मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आपण डिझेलबद्दल बोललो, तर त्यासाठी डेन्सिटी ८३० ते ९०० किलो प्रति क्युबिक मीटर निश्चित केली आहे.

ज्याप्रमाणे दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित केले जातात, त्याचप्रमाणे दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलची डेन्सिटी तपासल्यानंतर ते देखील पेट्रोल पंपाद्वारे अपडेट केले जाते. अशा स्थितीत इंधनात कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळायची असेल तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेल भरताना केवळ शून्याकडेच नव्हे तर डेन्सिटीकडेही लक्ष द्या.