वॉरेन बफे निवृत्त! मुलगा नाही, तर 'या' व्यक्तीच्या हातात सोपवले अब्जो डॉलर्सचे साम्राज्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 14:21 IST2025-05-04T13:51:24+5:302025-05-04T14:21:16+5:30
Warren Buffett Successor: वॉरेन बफे यांनी 60 वर्षे बर्कशायर हॅथवे कंपनीचे CEO पद सांभाळल्यानंतर वयाच्या 94व्यी वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

Warren Buffett Successor: दिग्गज गुंतवणूकदार आणि अब्जावधीच्या मालमत्तेचे मालक वॉरेन बफे यांनी 2025 च्या अखेरीस बर्कशायर हॅथवे कंपनीच्या सीईओ पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
शनिवारी ओमाहा येथे बर्कशायरच्या वार्षिक बैठकीनंतर 94 वर्षीय बफेट यांनी ही घोषणा केली. त्यांनी कंपनीचे नेतृत्व ग्रेग एबेल (Greg Abel) यांच्याकडे सोपवल्याचेही सांगितले. एबेल सध्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.
जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या वॉरेन बफे यांचा हा निर्णय बर्कशायर हॅथवेसाठी एका युगाचा अंत झाल्यासारखा आहे. बफे गेल्या 60 वर्षांपासून या कंपनीचे सीईओ आहेत. या काळात त्यांनी स्वतःची एक यशस्वी आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित गुंतवणूकदार म्हणून ओळख निर्माण केली आहे.
निवृत्तीची घोषणा करताना बफे म्हणाले, "मला वाटते की या वर्षाच्या अखेरीस ग्रेग यांनी कंपनीचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्याची वेळ आली आहे. मी कंपनीत असेन आणि काही प्रकारे मदतही करेन, परंतु अंतिम निर्णय आता एबेलचा असेल."
ग्रेग एबेल कोण आहे? बफे यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे ग्रेग एबेल आता बर्कशायर हॅथवेचे सीईओ होणार आहेत. 62 वर्षीय एबेल यांना आधीपासून बफे यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.
1 जून 1962 रोजी कॅनडातील अल्बर्टा येथे जन्मलेल्या ग्रेग एबेलचे बालपण संघर्षांनी भरलेले होते. एका कामगार कुटुंबात वाढलेल्या ग्रेगने लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. ग्रेग त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात घरोघरी जाऊन पत्रके वाटायचे. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते त्यांच्या वडिलांसोबत अग्निशामक यंत्रे भरण्याचे काम करू लागले.
1984 मध्ये अल्बर्टा विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर 1992 मध्ये ते बफेच्या बर्कशायर हॅथवे कंपनीत सामील झाले. 2018 मध्ये ते बर्कशायरचे उपाध्यक्ष बनले. 2021 मध्ये त्यांना बफे यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. बोर्ड मीटिंग दरम्यान एबेल म्हणाले, बर्कशायरचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आणि हे मी माझे भाग्य समजतो.
वॉरेन बफेंचे साम्राज्य- वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवेला बुडत्या कापड कंपनीतून 1.16 ट्रिलियन डॉलर्सच्या महाकाय कंपनीत रुपांतरित केले. त्यांनी ही कंपनी सुमारे 60 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. आज बर्कशायर हॅथवे अमेरिकेतील जवळजवळ प्रत्येक मोठ्या उद्योगात आहे.
फोर्ब्सच्या मते, बफे यांची एकूण संपत्ती $168.2 अब्ज आहे. ही जवळजवळ सर्व बर्कशायरच्या शेअर्सच्या स्वरुपात आहे. बफेट यांनी असेही स्पष्ट केले आहे की, ते त्यांचा बर्कशायर हॅथवेमधील कोणताही शेअर विकणणार नाहीत. त्यांच्याकडे असलेले जे काही शेअर्स आहेत, ते त्याच्या मृत्यूनंतर दान केले जातील.