UPI फ्री आहे, मग Google Pay अन् PhonePe ने ₹५,००० कोटी कुठून कमवले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:01 IST2025-07-22T14:55:40+5:302025-07-22T15:01:36+5:30
Google Pay आणि PhonePe सारखे अॅप्स ग्राहकांकडून शुल्क आकारत नाहीत, तरीही कोट्यवधी रुपये कमवतात.

भारतात दररोज लाखो लोक GooglePay किंवा PhonePe द्वारे पेमेंट करता आणि तेही मोफत! ऑनलाईन पेमेंटसाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तरीही, या कंपन्यांनी गेल्या वर्षी ₹५,०६५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
आता प्रश्न असा उद्भवतो की, या कंपन्या कोणतेही उत्पादन विकत नाहीत किंवा व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारत नाहीत, मग इतके पैसे कुठून येतात? तर UPI हा या कंपन्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे. खरे कमाईचे मार्ग इतर आहेत.
स्पीकर्स विकून करोडो कमावतात- तुम्ही दुकानांमध्ये "फोनपे कडून ₹१०० मिळाले" असा आवाज ऐकला असेल. हे व्हॉइस स्पीकर्स प्रत्यक्षात कंपन्यांसाठी उत्पन्नाचा एक मजबूत स्रोत आहेत. फोनपे, पेटीएम सारखे डिजिटल पेमेंट अॅप्स दुकानदारांना हे स्पीकर्स भाड्याने देतात आणि त्या बदल्यात दरमहा सुमारे ₹१०० आकारतात.
आजच्या युगात, चहाच्या दुकानांपासून ते रेशन दुकानांपर्यंत जवळजवळ प्रत्येक दुकानदाराच्या काउंटरवर हा स्पीकर दिसतो. फक्त या एकाच सेवेतून किती उत्पन्न मिळते याची कल्पना करता येते.
उदाहरणार्थ, आपण असे गृहीत धरू की, देशभरातील ५० लाखांहून अधिक दुकाने ही व्हॉइस स्पीकर सेवा वापरत आहेत. जर आपण गणितीयदृष्ट्या समजून घेतले तर, दरमहा ₹१०० × ५० लाख = ₹५० कोटी, म्हणजेच ₹६०० कोटी वार्षिक उत्पन्न. हे स्पीकर्स केवळ पेमेंट माहिती देत नाहीत, तर ग्राहकांमध्ये ब्रँडची उपस्थिती आणि विश्वास वाढवतात.
स्क्रॅच कार्ड्समधून कमाई- आता आपल्या सर्वांना आवडणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. कधीकधी ₹१० चा कॅशबॅक, कधीकधी डिस्काउंट कूपन. पण हे रिवॉर्ड्स प्रत्यक्षात युजर्ससाठी नाही तर ब्रँड्ससाठी एक शक्तिशाली जाहिरात साधन आहेत.
ब्रँड्स या कंपन्यांना पैसे देतात, जेणेकरुन त्यांचे नाव, ऑफर आणि प्रमोशन या स्क्रॅच कार्ड्सद्वारे कोट्यवधी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतील. म्हणजेच, वापरकर्त्याला रिवॉर्ड्स मिळतात, कंपनीला एंगेजमेंट मिळते आणि ब्रँडला प्रमोशन मिळते. गुगल पे, फोनपे यातून प्रचंड जाहिरात महसूल मिळवते. हे या अॅप्ससाठी उत्पन्नाचा दुसरा मोठा स्रोत बनते.
अॅप्स कर्जातून खूप कमाई करतात- आता आपण SaaS आणि कर्ज सेवांच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या पैलूकडे येतो. या कंपन्यांनी UPI ला फक्त पेमेंट टूल राहू दिले नाही, तर ते लहान व्यवसायांसाठी एक कर्जाचे साधनही बनले आहे. आता हे अॅप्स जीएसटी मदत, इनव्हॉइस मेकिंग आणि लघु कर्जे यासारख्या सेवा देखील प्रदान करतात.
म्हणजेच, आता हे फक्त पेमेंट अॅप्स राहिलेले नाहीत, तर व्यवसायांसाठी एक छोटे कार्यालय बनले आहेत. याशिवाय, या अॅप्सनी मोबाईल रिचार्जपासून वीज बिल भरण्यापर्यंत सेवा देखील देण्यास सुरुवात केली आहे. या सुविधांच्या बदल्यात, या कंपन्या प्लॅटफॉर्म शुल्क आकारतात, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.