"... तर ते अन्यायकारक ठरेल" ट्रम्प यांनी भारताचं नाव घेऊन कोणता मोठा इशारा केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 08:37 IST2025-02-20T08:25:27+5:302025-02-20T08:37:08+5:30

America President Donald Trump On India: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांशी जशास तसं वागणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर आता पुम्हा एकदा ट्रम्प यांनी भारताला इशारा दिलाय.

America President Donald Trump On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेस्लासारख्या कंपन्यांवर जास्त आयात शुल्क लादल्याचा आरोप केला आहे. इलॉन मस्क यांनी भारतात प्रकल्प उभारला तर तो अमेरिकेवर अत्यंत अन्यायकारक ठरेल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

जितका कर भारत आपल्या वस्तूंवर आकारतो तितकाच कर अमेरिकाही आकारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. फॉक्स न्यूजवर शॉन हॅनिटीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारताचं नाव घेत अनेक देश अमेरिकेचा गैरफायदा घेत असल्याचं म्हटलं आहे. हे सर्व उच्च आयात शुल्काच्या माध्यमातून केलं जातं असल्याचं ते म्हणाले.

परस्पर शुल्काच्या बाबतीत आपण कोणताही अपवाद ठेवणार नसल्याचं ट्रम्प यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथे ट्रम्प यांनी आपण या प्रकरणात कोणतीही सूट देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

"जगातील प्रत्येक देश आमचा फायदा उचलतो. ते टॅरिफच्या माध्यमातून असं करतात. ते त्यांच्यासाठी (मस्क) कार विकणं व्यवहारिक रुपात अशक्य करतात, उदाहरण घ्यायचं झालं तर भारताचं घेता येईल. जर मस्क यांना भारतात आपला प्रकल्प उभारायचा असेल तर ते ठीक आहे, परंतु हे अमेरिकेसाठी अन्यायकारक असेल," असं ट्रम्प म्हणाले.

भारत ऑटोमोबाइलवर १०० टक्के टॅरिफ आकारतं, याला मस्क यांनीही दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान, आपणही भारताप्रमाणेच टॅरिफ लावणार असल्याचं सांगितलं आहे, असं ट्रम्प म्हणाले. हीच पद्धत इतर देशांसोबतही अवलंबणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोदी आणि मस्क यांच्यात नुकतीच चर्चा झाली त्यानंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर येत आहे. टेस्लाच्या भारतात आगमनाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. परंतु, उच्च आयात शुल्क आणि भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगामुळे अद्याप कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार धोरणांवरून वाद सुरूच आहे.

ट्रम्प यांच्या इशाऱ्याचा आणि प्रत्युत्तराचा परिणाम दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर होऊ शकतो. सूत्रांनी बिझनेस टुडेला दिलेल्या माहितीनुसार टेस्लाचे अधिकारी एप्रिलमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते त्यांच्या कामाचा आढावा घेतील.

पंतप्रधान कार्यालय, अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) सारख्या सरकारी विभागांशी टेस्लाचे अधिकारी संवाद साधणारेत. टेस्लानं महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर, तसंच गुजरात हे उत्पादन केंद्र म्हणून निवडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सुरुवातीला ३-५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते.