'या' सहा कामांसाठी जून महिना महत्त्वाचा; लवकर उरकून घ्या, अन्यथा होईल पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:30 AM2023-05-29T11:30:17+5:302023-05-29T11:39:34+5:30

नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. पैशांसंदर्भातील काही कामांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. पैशांसंदर्भातील काही कामांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील़. अन्यथा लोकांची पंचाईत तर होईलच, शिवाय आर्थिक फटकाही बसू शकतो.

पॅन आणि आधार क्रमांक जोडण्यासाठीची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत दोन्ही क्रमांक करदात्यांनी जोडून घेणे आवश्यक आहे. याशिवाय अशा एकूण ६ वित्तीय बाबींची मुदत जूनमध्ये संपणार आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

पॅन-आधार जोडणी कोणासाठी आवश्यक? : ज्यांना १ जुलै २०१७ पूर्वी पॅन क्रमांक दिला गेला आहे तसेच जे आधार क्रमांक मिळण्यास पात्र आहेत, अशा सर्वांना पॅन आणि आधार यांची जोडणी करणे आवश्यक आहे. त्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ आहे.

वाढीव ईपीएस पेन्शन : वाढीव ईपीएस पेन्शन मिळण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ आहे. आधी ही मुदत ३ मार्चपर्यंतच होती. तथापि, ईपीएओ सदस्यांच्या मागणीनंतर ती वाढविण्यात आली आहे.

मोफत आधार अद्ययावतीकरण : आधार कार्डवरील आपला वैयक्तिक तपशील मोफत अद्ययावत करून घेण्यासाठी १५ मार्च ते १४ जून २०२३ या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार पोर्टलवरच ही सेवा मोफत आहे. आधार केंद्रांवर मात्र त्यासाठी ५० रुपये शुल्क आहे.

बँक लॉकर करार : रिझर्व्ह बँकेने बँक लॉकर करारांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यासाठी बँकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. ५० टक्के नूतनीकरण ३० जून २०२३ पर्यंत करावे लागणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के करारांचे नूतनीकरण होईल.

इंडियन बँक स्पेशल एफडी : इंडियन बँकेच्या ‘आयएनडी सुपर ४०० डेज’ स्पेशल एफडीची मुदत ३० जून २०२३ पर्यंत आहे. यातील व्याजदर सामान्यांसाठी ७.२५ टक्के, ज्येष्ठांसाठी ७.७५ टक्के आणि अतिज्येष्ठांसाठी (सुपर सिनिअर सिटीझन्स) ८.०० टक्के आहे.

एसबीआय अमृतकलश : एसबीआयने ‘अमृतकलश’ किरकोळ ठेव योजना पुनरुज्जीवित केली असून, या योजनेची ४०० दिवसांची मुदत ३० जून २०२३ रोजी संपणार आहे. यात सामान्यांसाठी ७.१० टक्के आणि ज्येष्ठांसाठी ७.६० टक्के व्याजदर आहे.