भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:37 IST2025-01-25T17:27:11+5:302025-01-25T17:37:22+5:30
NPS Pension Plan at Age of 35-40: एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

निवृत्तीनंतरचे किंवा उतारवयातले भोग कोणालाही चुकलेले नाहीत, हे रेमंडच्या मालकाची काही महिन्यांपूर्वीपर्यंत झालेली हालत, यावरून लक्षात येते. निवृत्तीनंतर जर योग्य प्रमाणावर पैसा हाती आला नाही तर किती अबाळ होते, मुलांवर अवलंबून रहावे लागते, ते आजकाल अनेकांनी अनुभव घेतलेले आहेत. यामुळे लोकांना अनेकदा वेळेवर योग्य गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
नोकरदारांना पीएफचा पर्याय असतो. परंतू तो आजची आणि उद्याची येणारी महागाई पाहता पुरेसा ठरणार नाही. यामुळे पगारातूनच थोडेफार पैसे वाचवून त्यांची गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकणार आहे. निवृत्तीनंतर पेन्शन खूप महत्वाची ठरते. यासाठी एनपीएस खूप उपयोगी आहे. जी तुम्हाला निवृत्तीनंतर पीएफसारखी एक ठराविक रक्कम देते आणि दर महिन्याला पेन्शनही.
एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, कर्मचारी आणि मालक दोघांच्याही योगदानावर कर लाभ उपलब्ध आहेत. ही योजना बाजाराशी जोडलेली असल्याने, ती बाजार आधारित परतावा देते. एनपीएसमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
या योजनेअंतर्गत, निवृत्तीनंतर एकूण ठेवीपैकी ६० टक्के रक्कम काढता येते. उर्वरित ४० टक्के पेन्शन योजनेत जातो. हे खाते देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून हाताळता येते.
काही गोष्टींवर नजर मारणे खूप आवश्यक आहे. जसे की, जर एकूण निधी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला वार्षिक पेन्शन योजनेत ४० टक्के द्यावे लागत नाहीत. तर तुम्हाला ती जी रक्कम असते ती पूर्णपणे परत मिळते.
३५ वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये अधिक एक्सपोजर मिळतो. यामुळे जर एनपीएसचे नियोजन वयाच्या ३५ व्या वर्षी केले तर तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
तुमचे वय ४० वर्षे असेल, तर तुम्ही निवृत्तीनंतरच्या २० वर्षांच्या वयापर्यंत १ लाख रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यासाठी दर महिन्याला २०००० रुपये गुंतविणे गरजेचे आहेत.
तुम्ही गुंतविलेल्या रकमेवर अंदाजे रिटर्न १० टक्के जरी पकडला तरी ती रक्कम 3 कोटी 23 लाख रुपये होते. 1.85 कोटी रुपये तुम्हाला परत मिळतात व उर्वरित रकमेची पेन्शन मिळत जाते. 41.23 लाख रुपये तुमच्ये व्याजापोटी वाचतात. व दर महिन्याला तुम्हाला १ लाख रुपयांची पेन्शन मिळते.