TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 08:21 AM2021-09-23T08:21:40+5:302021-09-23T08:26:28+5:30

कोरोना संकटकाळातही TATA ग्रुपमधील एका कंपनीने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

कोरोना संकटामुळे उद्योगविश्वाची घडी विस्कटलेली आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून, त्यातून औद्योगिक क्षेत्रही सुटलेले नाही. एकीकडे कंपन्यांमधून कामगारांना कमी करण्यात येत आहे, कामगारांच्या वेतनात कपात करण्यात येत आहे.

अशा संकटकाळातही TATA ग्रुपमधील एका कंपनीने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सलग तिसऱ्या वर्षी बोनस जाहीर करणारी कंपनी म्हणजे Tata Motors.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कोरोना संकटकाळातही Tata मोटर्स कंपनीने कामगारांना यंदा दिवाळीसाठी किमान ३८ हजार २०० रुपये ते कमाल ५० हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे.

या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे. करोना संकटकाळातील दोन वर्षांसह सलग तीन वर्षे घसघशीत बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय सुपर एन्युएशनच्या अंतर्गत येणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना ११ हजार २०० रुपये अनुदान म्हणून दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tata मोटर्स व्यवस्थापन आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिझनेस स्कोर कार्ड (बीएससी)चा आधार घेऊन बोनसचे सूत्र ठरवण्यात आले आहे.

या सूत्रानुसार गेल्या वर्षी ३५ हजार २०० रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात तीन हजारांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, Tata मोटर्सने ऑगस्ट महिन्याच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. यातच Tata ने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आघाडी राखून ठेवली आहे.

भारतातून उत्पादन बंद केलेल्या फोर्डला एकेकाळी तोट्यातील Tata मोटर्स विकण्यासाठी रतन टाटा प्रयत्नशील होते. मात्र, फोर्डकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. पुढे टाटांनी अथक परिश्रम आणि कठोर मेहनत घेऊन टाटा मोटर्स नफ्यात आणली.

नवनवीन डिझाईन, फिचर्स आणि सेफ्टी यामध्ये टाटाच्या कारनी मोठी झेप घेतली आहे. यामुळे टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांची पसंती ठरू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमवून दिला आहे.

Tata मोटर्सचे बाजारमुल्य हे एक लाख कोटींहून अधिक आहे. दुसरीकडे, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने लोकांचा ओढा सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारकडे वळू लागला आहे. इलेक्ट्रीक कारचे जास्त पर्याय लोकांसमोर नाहीत, तसेच महागडेही आहेत.

Tata मोटर्स आपल्या दणकट Tata Nexon सह, Tata Altroz, Tata Tiago आणि Tata Tigor चे सीएनजी व्हेरिअंट लाँच करणार आहे. यामुळे काही महिन्यांत लोकांसमोर पैसे वाचविण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या वर्षाच्या अखेरपर्यंत Tata Nexon CNG, Tata Altroz CNG, Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG मॉडेल लाँच होतील. कंपनीने या बाबत काही ठोस सांगितलेले नसले तरी देखील टाटाच्या या कारना सीएनजी टेस्टिंग किटसह पाहिले गेले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी Nexon, Altroz सीएनजी टेस्टिंग करताना दिसली होती. Tata मोटर्स पुढील महिन्यात टाटा पंच (Tata Punch) मायक्रो एसयुव्ही लाँच करणार आहे.