मुलीच्या लग्नावर ५५० कोटी खर्च करणारा अब्जाधीश आता दिवाळखोर; कसं संपलं अब्जावधींचं साम्राज्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:08 IST2025-01-07T08:40:35+5:302025-01-07T09:08:22+5:30
Pramod Mittal Bankrupt : दिग्गज व्यावसायिकाशी आहे यांचं नातं. पाहा नक्की कशी लागली उतरती कळा.

Pramod Mittal Bankrupt : प्रमोद मित्तल एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. आता त्यांचं अब्जावधींचं साम्राज्य संपलंय. प्रमोद मित्तल हे २०२० मध्ये दिवाळखोर झाले. त्यानंतर लंडन कोर्टानं त्यांना दिवाळखोर घोषित केले होते.
तुम्हाला माहितीये का प्रमोद मित्तल हे कोण आहेत? प्रमोद मित्तल हे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आहेत. दिवाळखोरीनंतर त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की, दैनंदिन खर्चासाठी त्यांना कुटुंबावर अवलंबून राहावं लागलं. त्यांच्यावर १३० दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त कर्ज होते. दिल्लीत त्यांची केवळ ४५ पौंड संपत्ती शिल्लक होती.
प्रमोद मित्तल स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आता जेएसडब्ल्यू स्टील) अध्यक्ष राहिले होते. एकेकाळी त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असे. ते त्यांच्या आलिशान जीवनशैली आणि खर्चीक सवयींसाठी ओळखले जात होते. त्यांनी आपली मुलगी सृष्टीच्या हिच्या लग्नावर त्यांनी सुमारे ५५० कोटी रुपये खर्च केले होते. २०१३ मध्ये हा विवाह झाला होता.
मित्तल यांच्या दिवाळखोरीची कहाणी जीआयकेआयएल या बोस्नियाच्या कोक कंपनीशी जोडलेली आहे. प्रमोद मित्तल यांनी जीआयकेआयएलच्या कर्जाची हमी घेतली होती. जीआयकेआयएल कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने मित्तल यांनाही फटका बसला. जीआयकेआयएल लंडनस्थित स्टील ट्रेडिंग कंपनीला पैसे देऊ शकली नाही, ज्याचे मित्तल गॅरंटर होते.
त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली. अखेर त्यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलं. २०१९ मध्ये प्रमोद मित्तल आणि जीआयकेआयएलच्या इतर दोन अधिकाऱ्यांना बोस्नियातील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
दिवाळखोरीच्या वेळी प्रमोद मित्तल ६८ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी २.५ अब्ज पौंड (सुमारे २४ हजार कोटी रुपये) कर्जदारांना दिले होते. दिवाळखोरी याचिकेत त्यांनी आपले कोणतेही वैयक्तिक उत्पन्न नसल्याचं नमूद केलंय. दिल्लीतील केवळ ४५ पौंड किमतीची मालमत्ता त्यांच्या नावावर होती.
दुसरीकडे त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल आजही जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १५.५ अब्ज डॉलर्स आहे. एकेकाळी अब्जाधीशांमध्ये गणना होणारे मित्तल अचानक दिवाळखोर झाले. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत, हा धडा म्हणजे प्रमोद मित्तल यांचा हा प्रवास आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण साम्राज्य धोक्यात येऊ शकतं हे यावरुन दिसून येतं.