युद्ध सुरू असताना रशियाची भारताला 'स्विफ्ट' ऑफर; प्रस्ताव स्वीकारल्यास फायदेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:53 PM2022-03-31T13:53:36+5:302022-03-31T13:56:34+5:30

युक्रेनविरुद्धच युद्ध सुरू होऊन महिना उलटला असताना रशियाची भारताला मोठी ऑफर

रशिया-युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. याचा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे रशियानं भारताला महत्त्वाच्या प्रस्ताव दिला आहे.

भारत आयात करत असलेल्या सामानाची खरेदी करण्यासंदर्भात रशियानं महत्त्वाची ऑफर दिली आहे. सध्या मोदी सरकार या प्रस्तावाबद्दल विचार करत आहे. निर्बंधांमुळे डॉलर मिळत नसल्यानं रशियाच्या सर्वोच्च बँकेनं एक नवी यंत्रणा विकसित केली आहे.

भारत रशियाकडून मुख्यत: खनिज तेल आणि शस्त्रास्त्रं खरेदी करतो. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यानं भारतानं नुकतीच रशियाकडून सूर्यफूलाचं तेल खरेदी केलं. यासाठी दोन देशांमध्ये मोठा करार झाला.

ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाची मॅसेजिंग यंत्रणा एसपीएफएसचा वापर करून रुपया-रुबलमध्ये व्यवहाराचा प्रस्ताव दिला आहे. भारत सरकारनं अद्याप तरी या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या सरकारकडून प्रस्तावाचा विचार सुरू आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दरम्यान रशियाच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. रशियाचा प्रस्ताव स्वीकारल्यास भारतात स्वस्तात खनिज तेल मिळेल. त्यामुळे भारतीयांना दिलासा मिळेल.

नव्या यंत्रणेनुसार, रशियन चलन असलेलं रुबल भारतीय बँकेत जमा करण्यात येईल. त्यानंतर त्याचं रुपांतर रुपयात केलं जाईल. याचप्रकारे रुपयाचं रुपांतर रुबलमध्ये करून पैसे दिले जातील.

रशियन सरकार भारताला केवळ ऑफर देऊन थांबलेलं नाही. या प्रस्तावाबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी रशियाच्या केंद्रीय बँकेचे अधिकारी भारतात येऊ शकतात. खनिज तेलाच्या दरात वाढ होत असल्यानं भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याची शक्यता आहे.

रशियाचा प्रस्ताव स्वीकारल्यास भारताला आणखीही फायदे होतील. रशियासोबत रुपयात व्यवहार झाल्यास भारताची परकीय गंगाजळी वाचेल. यासोबतच भारतीय चलन असलेला रुपयादेखील मजबूत होईल.