₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश

By जयदीप दाभोळकर | Updated: April 30, 2025 09:16 IST2025-04-30T09:07:35+5:302025-04-30T09:16:34+5:30

घर घेण्यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्ज घेण्याची आवश्यकता असते. पण हेही खरं आहे की ईएमआय भरताना तुम्हाला कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. कारण गृहकर्जावर ९ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं.

घर घेण्यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्ज घेण्याची आवश्यकता असते. पण हेही खरं आहे की ईएमआय भरताना तुम्हाला कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. कारण गृहकर्जावर ९ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं. तर काही लोकांना असं वाटतं की जर तुम्ही ईएमआयच्या रकमेऐवजी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यात अधिक फायदे मिळू शकतात. त्यामुळे आता आपण संभ्रम दूर करू आणि गणितातून समजून घेऊ की एसआयपी चांगली किंवा होम लोनचा ईएमआय भरणं?

जर तुम्ही ७७ लाख रुपयांपर्यंतचं घर खरेदी करत असाल तर ते खरेदी करण्याचे दोन मार्ग असू शकतात. पहिला मार्ग म्हणजे गृहकर्ज घेऊन ताबडतोब घर खरेदी करणं किंवा गुंतवणूक करून पैसे जमा करणं आणि नंतर खरेदी करणे. चला तर मग या दोघांची तुलना करूया.

गृहकर्ज घेऊन आणि ईएमआयची परतफेड करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरात सहज शिफ्ट होऊ शकता. दुसरीकडे, तुम्ही ईएमआयएवढ्याच रकमेसाठी एसआयपी सुरू करू शकता. जेव्हा तुमचं लक्ष्य गाठलं जाईल, तेव्हा तुम्ही घर खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याचं गणित काय सांगतं.

जर तुमच्या घराची किंमत ₹७७,००,००० असेल तर डाउन पेमेंट (२०%) १५,४०,००० रुपये असेल. तर कर्जाची रक्कम (८० टक्के) ६१ लाख ६० हजार रुपये असेल. या कर्जावरील व्याजदर (अंदाजे) वार्षिक ८.७५% असेल. तुमच्या होम लोनची मुदत २० वर्षे (२४० महिने) असेल आणि मासिक ईएमआय ५५,०२७ रुपये असेल.

आता २० वर्षांच्या कर्जावर किती व्याज भरावं लागेल याबद्दल जाणून घेऊ. ६१.६ लाखांच्या कर्जावर तुम्हाला ७०,४६,४८० रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. त्यामुळे तुमची मूळ रक्कम ६१.६ लाख रुपये आणि व्याज ७०.४६ लाख रुपये असेल. २० वर्षांत गृहकर्जासाठी बँकेला एकूण १,३२,०६,४८० रुपये भरावे लागतील. डाऊन पेमेंट स्वतंत्रपणे १५.४ लाख रुपये असेल.

तर आता समजा तुम्ही दर महा म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गृहकर्जाच्या ईएमआय (₹५५,०२७) एवढीच रक्कम गुंतवणार आहात. या एसआयपी गुंतवणुकीवर अंदाजे वार्षिक परतावा १२% पर्यंत असू शकतो. त्यानुसार तुम्ही जवळपास ६ वर्ष ७ महिन्यांत (७९ महिने) आपले सुमारे ७७ लाख रुपयांचे लक्ष्य पूर्ण करू शकता.

आता जर तुम्ही ७९ महिन्यात गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक ४३,४७,१३३ रुपये असेल. या गुंतवणूकीवर तुम्हाला अंदाजे ३३,५२,८६७ रुपयांचा नफा मिळू शकेल. जर तुम्ही SIP चा पर्याय निवडाला तर सुमारे १३ वर्षांपूर्वीच घर खरेदीसाठी आवश्यक निधी जमा करु शकता. तसंच सुमारे ७० लाखांचं व्याजदेखील तुम्हाला वाचवता येईल. आता गणितानुसार SIP अधिक फायदेशीर दिसत आहेत.

SIP मध्ये १२% परतावा असण्याची कोणतीही गॅरेंटी नसते. एसआयपीमध्ये बाजाराची जोखीम असते. यासोबतच ६ ते ७ वर्षांमध्ये प्रॉपर्टीची किंमत देखील वाढू शकते (₹७७ लाखांपेक्षा अधिक होऊ शकते). या कालावधीत तुम्हाला भाड्याच्या घरात राहावं लागेल. गृह कर्ज घेतल्यास तुम्ही त्वरित आपल्या घरात राहायला सुरुवात करू शकता.

दोघांचेही आपले फायदे तोटे आहेत. आपलं उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता आणि गरजा पाहून आपण नेहमीच योग्य निर्णय घ्यावा. एसआयपी गुंतवणूक किंवा कर्जाशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेण्यास विसरू नका (टीप: यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)