Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?

By जयदीप दाभोळकर | Updated: November 4, 2025 09:22 IST2025-11-04T09:08:24+5:302025-11-04T09:22:51+5:30

पाहा या दिग्गजानं नक्की काय म्हटलंय आणि कोणता दिलाय इशारा. जाणून घ्या कोणतं भाकित करुन त्यांनी अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.

Robert Kiyosaki Alert: प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण होणार असल्याचा इशारा दिला आहे. 'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad) या आपल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकामुळे ते ओळखले जातात. कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली होती. 'मोठी घसरण सुरू होत आहे: लाखो लोक उद्ध्वस्त होतील. स्वतःला सुरक्षित ठेवा,' असं त्यांनी म्हटलंय.

कियोसाकी त्यांच्या आगळ्यावेगळ्या गुंतवणूक विचारांसाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की, आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या बाजारातून वॉल स्ट्रीटचे लाखो डॉलर गायब होऊ शकतात. त्यांनी गुंतवणूकदारांना सोनं, चांदी, बिटकॉइन आणि इथेरिअम (Ethereum) यांसारख्या 'हार्ड ॲसेट्स'मध्ये गुंतवणूक करून स्वतःला वाचवण्याचा सल्ला दिला आहे. अत्यंत अस्थिरतेच्या काळात या मालमत्ता सर्वात सुरक्षित असल्याचं ते मानतात.

कियोसाकी यांचा हा इशारा अमेरिकेच्या बाजारावर केंद्रित असला तरी, याचा फटका जगासह भारतीय बाजारांनाही बसू शकतो. जेव्हा अमेरिका किंवा इतर विकसित बाजारांमध्ये मोठी घसरण होते किंवा मंदीची शक्यता वाढते, तेव्हा परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) सुरक्षिततेच्या शोधात भारत सारख्या उदयोन्मुख बाजारातून आपला पैसा वेगाने काढायला सुरुवात करतात. या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मागील अनेक जागतिक संकटांच्या काळात हे दिसून आले आहे. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये एकाच दिवसात बुडू शकतात.

स्टॉक, बाँड्स आणि फियाट चलन (उदा. रुपया, डॉलर) यांसारख्या 'पेपर ॲसेट्स' म्हणजे 'बनावट पैसा' आहे, असं कियोसाकी मानतात. सिस्टिमॅटिक कोलॅप्स (संपूर्ण व्यवस्था कोलमडणे) होण्याचा धोका त्यांना आहे. याउलट, ते मौल्यवान धातू आणि क्रिप्टोकरन्सीजसारख्या 'रियल ॲसेट्स'ला महागाई, कर्जाचे संकट आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांपासून बचाव करण्याचा मार्ग मानतात.

कियोसाकी यांच्या या विधानामुळे ऑनलाइन वाद सुरू झाला आहे. काही लोक त्यांच्या चिंतेशी सहमत आहेत, तर काही जण त्यांच्या वारंवार येणाऱ्या घसरणीच्या इशाऱ्यांना अतिशयोक्तीपूर्ण ठरवत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'बॉब, तुम्ही दरवर्षी घसरणीबद्दल बोलत आला आहात... योगायोगाने एक दिवस तुम्ही बरोबर ठराल. बाजार फक्त कोसळत नाहीत, त्यात बदल दिसून येतो. लिक्विडिटी (पैशांची उपलब्धता) कधीच संपत नाही.'

दुसऱ्या एका यूजरने इशारा दिला की, जर लिक्विडिटी कमी झाली, तर क्रिप्टो मालमत्ता इक्विटी पेक्षाही जास्त कोसळू शकतात. त्यांनी लिहिलं, 'जर लिक्विडिटीच्या समस्येमुळे शेअर्स कोसळले, तर $BTC आणि चांदी दुप्पट वेगाने कोसळतील.' तरीही, काही लोकांनी सोन्या-चांदीवर कियोसाकी यांनी दर्शवलेल्या विश्वासाचं समर्थन केलंय, त्यांना अनिश्चिततेत खरं 'सेफ-हेवन ॲसेट्स' (सुरक्षित मालमत्ता) म्हटलंय.

सध्या मौल्यवान धातूंमध्ये (सोनं, चांदी) काहीशी कमजोरी दिसून आली आहे. याचं कारण अमेरिकन डॉलरचं मजबूत होणं आणि जागतिक पातळीवर जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढणं हे आहे. गेल्या काही आठवड्यांत सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत, कारण गुंतवणूकदार इक्विटी आणि डॉलर-आधारित मालमत्तांकडे वळत आहेत.

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन वरही दबाव आहे. या महिन्यात ते सुमारे ५% नं घसरले असून, ऑक्टोबरमधील विक्रमी उच्चांक $१,२६,००० वरून ते आता सुमारे $१,०४,७८२ वर आले आहे. इथेरिअम आणि इतर डिजिटल टोकनमध्येही अशीच घसरण दिसून आली आहे. कियोसाकी यांचे इशारे पुन्हा एकदा चर्चेत असताना, गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. काही जण मंदीसाठी तयारी करत आहेत, तर काही जण इतिहासाप्रमाणे बाजार स्वत:ला जुळवून घेईल आणि पुन्हा सावरणार यावर पैज लावत आहेत.