"ATM कार्डसंबधी तीन कामे आजच करा, तुमचे पैसे सुरक्षित राहतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 05:34 PM2020-10-02T17:34:03+5:302020-10-02T18:06:17+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI-Reserve Bank of India) सर्वसामान्य लोकांना त्यांच्या बँक खात्यात पैसे सुरक्षित ठेवण्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

सामान्य लोकांचे पैसे बँक खात्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर नवीन नियम लागू केले आहेत. या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबाबत आरबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

आरबीआयने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डसंबंधी तातडीने तीन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पहिले म्हणजे व्यवहारासाठी रोजची मर्यादा सेट करा. दुसरे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय वापरासाठी मर्यादा सेट करा आणि तिसरे आंतरराष्ट्रीय वापर चालू किंवा बंद करा.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, आता बँक ग्राहक स्वत: एटीएम आणि क्रेडिट कार्डची मर्यादा देखील ठरवू शकतात. म्हणजेच, आपल्याला असे हवे आहे की आपल्या कार्डावर एक हजाराहून अधिक रक्कम काढत येऊ नये, तर यासाठी इंटरनेटमधील मॅन्युअलमध्ये स्वत: ट्रांजक्शन लिमिट बदलू शकता.

याचबरोबर ग्राहक कधीही मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन किंवा आयव्हीआरद्वारे आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची मर्यादा बदलू शकतात.

ही सुविधा 24 तास आणि आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. म्हणजेच, आता तुम्ही आपल्या एटीएम कार्डचे ट्रांजक्शन लिमिट स्वत: ठरवू शकता.

आरबीआयने ग्राहकांना कोणती सेवा घ्यावयाची आहे व कोणती सेवा थांबवावी हे त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना आता ग्राहकांना फक्त घरगुती व्यवहारासाठी परवानगी मिळेल. याचा अर्थ असा की गरज नसल्यास एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि पीओएस टर्मिनल्सवर खरेदी करण्यासाठी परकीय व्यवहारास मान्यता दिली जाऊ नये.