शिक्षणाचा अभाव, सर्वांनीच मारले टोमणे; आज 'त्या' युवकानेच कोट्यवधीची कंपनी उभारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 09:03 IST2024-12-13T08:59:41+5:302024-12-13T09:03:43+5:30

शिक्षणामुळेच माणूस श्रीमंत होतो असं नाही, तर आयुष्यात काही करण्याची जिद्द असली तर तुम्ही घेतलेले ज्ञान तुम्हाला यशाचा नवा मार्ग दाखवत राहते. शिक्षणात कमकुवत असलेले राकेश चोपदार यांची कहाणी अशीच आहे. आज ग्लोबल मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये राकेश यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राकेश चोपदार यांचे सुरुवातीचे दिवस फार बरे नव्हते. दहावीत कमी मार्क मिळाल्याने कुटुंबासह मित्रमंडळींच्या टीकेचा सामना राकेश यांना करावा लागला. त्यांना अनेकांनी अपयशावरून सुनावले परंतु राकेश यांनी हार मानली नाही. त्यांनी वडिलांच्या कारखान्यात एटलस फास्टनर्स म्हणून काम सुरू केले.
त्याठिकाणी राकेश यांनी इंजिनिअरींग आणि मॅन्युफॅक्चरिंगचे बारकावे शिकले. याच अनुभवाने त्यांच्या भविष्याचा पाया रचला गेला. राकेश चोपदार शिक्षणात हुशार नव्हते. अभ्यासात मागे पडल्याने खूप टोमणे ऐकावे लागत होते. शाळा सोडल्यामुळे पुढचं आयुष्य कसं जाणार हाच प्रश्न पडला होता.
त्यानंतर राकेश यांनी वडिलांसोबत नट बोल्ट बनवण्याच्या फॅक्टरी काम सुरू केले. १२ वर्ष कौटुंबिक व्यवसायात काम केल्यानंतर राकेश यांनी २००८ मध्ये आजाद इंजिनिअरींगची सुरुवात केली. एका छोट्या शेडमध्ये सेकंड हँड CNC मशीन घेऊन त्यांनी सुरुवात केली. त्यांना थर्मल पावर फर्मानासाठी एअरफॉईल बनवण्याची मोठी ऑर्डर मिळाली. इथूनच त्यांच्या कंपनीचा प्रारंभ झाला.
आजाद इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग जगातील प्रसिद्ध कंपनी आहे. ही कंपनी हाय प्रिसिशन रोटेटिंग पार्ट्स बनवतात. हे पार्ट्स वीज उत्पादन, सैन्य विमान, तेल आणि गॅस क्षेत्रात वापरले जातात. कंपनीने रॉल्स रॉयल, बोईंग, GE आणि प्रँट एँन्ड व्हिटनीसारख्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे.
२००८ मध्ये २ कोटी रुपयाच्या गुंतवणुकीपासून सुरू झालेल्या आजाद इंजिनिअरिंग कंपनीने २०२३-२४ मध्ये ३५० कोटी रुपयांचा मिळवला आहे. पब्लिक लिस्टिंगनंतर कंपनीचं मार्केट वॅल्यूएशन १ अब्ज डॉलरहून अधिक झाले आहे. राकेशच्या नेतृत्वात आजाद इंजिनिअरिंग सातत्याने चढता आलेख पाहिला आहे. सचिन तेंडुलकर यानेही आजाद इंजिनिअरिंग कंपनीत गुंतवणूक केली आहे.
भविष्यात ८०० कोटी गुंतवणुकीत २ लाख मीटर वर्गात एक नवीन सुविधा कंपनी विकसित करत आहे. याठिकाणी एअरस्पेस, संरक्षण, ऊर्जासह तेल आणि गॅस सेक्टरवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अलीकडेच कंपनीने DRDO सोबत मिळून हायब्रिड टर्बो गॅस जनरेटर बनवण्याचा करार केला आहे. २०२६ च्या सुरुवातीला या इंजिनची पहिली बॅच येण्याची शक्यता आहे.
राकेशने कौटुंबिक व्यवसायात काम करत बराच अनुभव घेतला, त्यातून त्यांना पुढे जाण्याची मदत झाली. राकेश ना केवळ स्वत:साठी तर दुसऱ्यांसाठीही रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आहेत. राकेशची कहाणी तरुणांसाठी एक उदाहरण आहे. कठोर परिश्रम आणि समर्पणाने काहीही मिळवता येते हे त्यांना शिकवते.