३०० पेक्षा अधिक स्टोअर्स, ११ राज्यांत व्यवसाय; स्वस्त सामान, असं उभं केलं डी-मार्टचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:56 AM2023-09-27T09:56:37+5:302023-09-27T10:03:55+5:30

स्वस्त वस्तूंसाठी डीमार्ट (Dmart) जवळपास संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

स्वस्त वस्तूंसाठी डीमार्ट (Dmart) जवळपास संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. नव्यानं उभारली जात असलेली शहरं असो किंवा प्रस्थापित मेट्रो शहरं असो, त्या ठिकाणी डीमार्ट हे दिसतंच. आज बहुतांश लोक डीमार्टमधून त्यांच्या महिन्याभराच्या किराणामालाची किंवा अन्य वस्तूंची खरेदी करताना दिसतात.

परिस्थिती अशी आहे की जर अशा भागात डीमार्ट उभारलं जात असेल आणि तेथे कोणतीही लक्षणीय वस्ती नसेल तर तेथील जमिनीचे दर वाढू लागतात. कारण डीमार्ट काहीतरी विचार करून या ठिकाणी गुंतवणूक करत असेल असं अनेकांना वाटतं. त्यामुळे भविष्यात या ठिकाणचे दर वाढतील असा अनेकांता समजही होतो.

डीमार्टवरील या भरवशामागे आणि प्रगतीमागे राधाकिशन दमानी हे आहेत. हे तेच आहेत जे दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला आपले गुरू मानत होते. राधाकिशन दमानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात.

त्यांची संपत्ती एक लाख कोटींहून अधिक आहे. राधाकिशन दमानी केवळ १२ वी उत्तीर्ण आहेत. पण त्यांच्या कौशल्यामुळे आणि कुशाग्र बुद्धीमुळे आज त्यांची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे.

शेअर मार्केटमध्ये नाव कमावणाऱ्या दमानी यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना सुरुवातीला त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नेरूळची फ्रँचायझी घेतली जी अयशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी बोअरवेल बांधण्यास सुरुवात केली, पण या कामातही त्यांना यश आलं नाही.

त्यानंतर २००२ मध्ये त्यांनी मुंबईत डीमार्टचे पहिले स्टोअर उघडलं. परंतु आपण कोणत्याही भाड्याच्या जागेत डीमार्ट सुरू करणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. आज DMart ची देशात ३०० हून अधिक स्टोअर्स आहेत. म्हणजे राधाकिशन दमानी यांच्याकडे केवळ डीमार्ट स्टोअर्स नाहीत, तर त्यांच्याकडे भारतात ३०० मोठ्या जमिनी आहेत. त्यांची ही स्टोअर्स ११ राज्यांमध्ये पसरलेली आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की डीमार्टमध्ये सामान स्वस्त कसं. याचं महत्त्वाचं कारम वर तुम्हाला कळलंच असेल. राधाकिशन दमानी यांनी भाड्याच्या जागेवर दुकान न उघडल्यानं यात त्यांना खूप मदत होते. त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत आणि त्यांना नियमित अंतरानं भाडं द्यावं लागत नाही. हा उरलेला खर्च ते माल स्वस्त ठेवण्यासाठी वापरतात.

त्याचप्रमाणे, DMart ५-७ टक्के बचत करते आणि सवलतीच्या रूपात लोकांना देते. दुसरे कारण म्हणजे डीमार्ट त्वरीत स्टॉक क्लिअर करते. ३० दिवसांत माल संपवून नवीन माल मागवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. याशिवाय, डीमार्ट कंपन्यांना फार लवकर पेमेंट करते. यामुळे उत्पादक कंपन्याही डीमार्टला सवलतीत वस्तू पुरवतात. या सवलतीचा वापर लोकांना सवलत देण्यासाठी किंवा स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी देखील केला जातो.