कर बचतीसाठी केवळ 11 दिवस शिल्लक! 'ही' योजना देते चांगला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 06:35 IST2023-03-20T06:25:34+5:302023-03-20T06:35:09+5:30
३१ मार्चपूर्वी कर सवलतीस पात्र असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचतीचा लाभ होईल, शिवाय परतावाही चांगला मिळेल.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. अजुनही कर वाचविण्यासाठी नागरिकांना संधी आहे. ३१ मार्चपूर्वी कर सवलतीस पात्र असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचतीचा लाभ होईल, शिवाय परतावाही चांगला मिळेल. त्यादृष्टीने टपाल खात्याची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना उपयुक्त ठरू शकते.
या योजनेत कोणतीही कमाल मर्यादा नाही
७ टक्के व्याजदराने या योजनेत परतावा मिळतो. १ हजार रुपये किमान गुंतवणूक करता येते. ५ वर्षांचा लॉकइन पिरियड आहे. ८०सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो. १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक ८० सीमध्ये करमुक्त असते. कोणतीही कमाल मर्यादा या योजनेत नाही.
मुलांच्या नावानेही गुंतवणूक शक्य
मुलांच्या नावानेही खाते उघडता येते. मुलांचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास त्यांच्या नावाने आईवडिलांच्या वतीने खाते उघडता येते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना त्यांचे खाते ते संचालित करू शकतात.
दुप्पट गुंतवणूक होण्यास एवढा कालावधी
योजनेत सध्या वार्षिक ७ टक्के दराने व्याज मिळते. ‘रुल ऑफ ७२’ च्या हिशोबाने या योजनेतील गुंतवणूक १० वर्षे २ महिन्यांमध्ये दुप्पट होते.
गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात
लॉकइन पिरियड असल्याने ६० महिने पैसे काढता येणार नाही. २-३ वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना योग्य नाही. मॅच्युरिटी कालावधीदरम्यान अधूनमधून पैसे काढायचे असल्यास तसे शक्य नाही.
पॅन-आधार लिंक करण्याची अखेरची संधी
सरकारने काही वर्षांपूर्वी आधार आणि पॅन लिंक करण्याची सूचना केली होती. ३० जून २०२२ नंतर यासाठी १ हजार रुपयांचे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. आता ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करण्याची अखेरची मुदत असून, लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय करण्यात येणार आहे. तसे झाल्यास लोकांना म्युच्युअल फंड किंवा डिमॅट खाते उघडता येणार नाही. याशिवाय कोणतेही कागदपत्र म्हणून पॅनचा वापर केल्यास १० हजार रुपयांचा दंडही बसू शकतो.