पेट्रोल-डिझेलमधून सरकारनं किती कमाई केली माहित्येय का? संसदेत दिली संपूर्ण माहिती, ऐकून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:59 PM2021-07-19T15:59:48+5:302021-07-19T16:03:42+5:30

Petrol Diesel Price Income: पेट्रोल-डिझेलवरील कराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत नेमकी किती कमाई झाली? याची माहिती आज संसदेत देण्यात आली आहे. जाणून घेऊयात...

पेट्रोल-डिझेलवरील करांमधून केंद्र सरकारला मोठी कमाई मिळते. पेट्रोल-डिझेलवरील करांमुळे केंद्र सरकारच्या मिळकतीत तब्बल ८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जात असले तरी केंद्राच्या तिजोरीत मात्र भरभराट झाल्याचं दिसून येत आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात केंद्र सरकारच्या तिजोरीत तब्बल ३.३५ लाख कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे केंद्र सरकारला बक्कळ फायदा झाल्याचं यातून स्पष्ट होतं आहे.

गेल्या वर्षी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.९८ रुपये इतकं होतं. यात वाढ होऊन सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलीटर ३२.९० रुपये इतकं झालं आहे.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत रेकॉर्ड ब्रेक स्तरावर कमी झाले होते. लॉकडाऊनमुळे अनेक वाहनं बंद असल्यानं तेलाच्या मागणीतही घट झाली होती. ही तूट भरुन काढण्यासाठी केंद्राकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती.

याच पद्धतीनं डिझेलवरील उत्पादन शुल्कातही जवळपास दुपटीनं वाढ करण्यात आली होती. डिझेलवरील उत्पादन शुल्क गेल्या वर्षी १५.८३ रुपये इतकं होतं. यात वाढ होऊन सध्या डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलीटर ३१.८० रुपये इतकं आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी याबाबतची माहिती आज संसदेत दिली.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे यावेळी केंद्रानं कराच्या स्वरुपात तब्बल ३.३५ लाख कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. रामेश्वर तेली यांच्या माहितीनुसार हा आकडा एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील आहे.

महत्वाची बाब अशी की याआधीच्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या माध्यमातून केंद्रानं केलेल्या कमाईचा आकडा १.७८ लाख कोटी इतका होता. त्यात यावेळी जवळपास दुप्पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर शंभरी पार गेला असला आणि त्यानं सर्वसामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत असलं. तरी केंद्राच्या तिजोरीत मात्र यामुळे भरभराट झाली आहे.