LIC कडून पॉलिसीधारकांना दिलासा; लाइफ सर्टिफिकेटसाठी सुरू केली ‘ही’ सुविधा

Published: May 12, 2021 06:58 PM2021-05-12T18:58:16+5:302021-05-12T19:03:17+5:30

अॅन्युटी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकांना LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिलासा दिला आहे.

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशभरातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अनेकविध व्यवहार ठप्प झाले आहेत.

LIC कडून पॉलिसीधारकांना दिलासा देण्यात आला आहे. आता पेन्शन मिळणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अॅन्युटी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकांना LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिलासा दिला आहे. या पॉलिसीधारकांना हयात असल्याचे प्रमाणपत्र (लाइफ सर्टिफिकेट) ई-मेलच्या माध्यमातून सादर करण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे अॅन्युटी पॉलिसी होल्डरना लाईफ सर्टिफिकेटसाठी LIC च्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. LIC ने अॅन्युटी पॉलिसींसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

अॅन्युटीज (कॅपिटल ऑप्शन) साठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे. तर लाईफ सर्टिफिकेट ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्याची सुविधा LIC कडून उपलब्ध करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून देखील लाईफ सर्टिफिकेट स्वीकारण्याची सुविधा LIC ने सुरू केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेता LIC ने मृत्यू दाव्यातील नियमावली शिथिल केली आहे.

मृत्यू दावे तातडीने निकाली काढण्याची प्रक्रिया जलद केली आहे. ज्यात एखाद्या पॉलिसीधारकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर पालिकेचे मृत्यू प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्र एलआयसीकडून स्वीकारले जात आहेत.

पॉलिसीधारकाच्या नातेवाईकांना एलआयसीच्या जवळच्या कोणत्याही शाखेत मृत्यू दाव्याची प्रक्रिया सुरु करता येईल, असे LIC ने म्हटलं आहे.

तसेच त्याशिवाय मृत्यू दाव्याची रक्कम तातडीने वारसांना मिळावी यासाठी एलआयसीकडून एनईएफटीचा वापर केला जात असल्याचे LIC ने म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!