शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प प्रत्येक गावात उभारणार; नितीन गडकरींचे नवे लक्ष्य

By देवेश फडके | Published: February 14, 2021 4:08 PM

1 / 10
देशाच्या प्रत्येक गावात शेणापासून रंग तयार करण्याचा कारखाना उभारण्याचे नवीन लक्ष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेवले आहे. सूक्ष्म, लघु तसेच मध्यम मंत्रालयाकडून यासाठी विशेष आखणी केली जात आहे. ‘वेदिक पेंट’ (Vedic Paint) या नावाने हे उत्पादन सादर करण्यात आले आहे.
2 / 10
नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आल्यास गावातील रोजगाराची समस्या संपुष्टात येऊन मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार नाही, असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हा रंग इकोफ्रेंडली असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 10
नितीन गडकरी यांनी सांगितले की, शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प लॉन्च केल्यानंतर, या कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. सध्या जयपूर येथे यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, यासाठी मोठ्या स्तरावर अर्ज आल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशिक्षण सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे, असे ते म्हणाले.
4 / 10
शेणापासून रंग तयार करण्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी साडेतीनशे अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत. शेणापासून रंग तयार करण्याचे प्रशिक्षण सात ते आठ दिवसांमध्ये पूर्ण होते. प्रत्येक गावात अशा प्रकारचा कारखाना किंवा प्रकल्प उभा राहिल्यास रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील, असेही नितीन गडकरी यांनी नमूद केले.
5 / 10
खादी तसेच ग्रामोद्योग आयोगाकडून शेणापासून नैसर्गिक रंग तयार करण्याची योजना जानेवारी महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. हा रंग इकोफ्रेंडली आहे. शेणापासून रंग तयार करण्याच्या कारखान्यासाठी आताच्या घडीला १५ लाख रुपये खर्च येत आहे.
6 / 10
भारतीय मानक ब्युरोने याला प्रमाणित केले आहे. हा रंग गंधहीन असून, डिस्टेंपर आणि प्लास्टिक इमल्शन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डिस्टेंपर १२० रुपये तर, प्लास्टिक इमल्शन २२५ रुपये लीटर किमतीत उपलब्ध होणार आहे.
7 / 10
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सन २०२० मध्ये या योजनेसाठी प्रोत्साहन दिले होते. खादी तसेच ग्रामोद्योग आयोगाने जयपूर येथे या अनोख्या प्रकल्पाची सुरुवात केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
8 / 10
शेणापासून तयार करण्यात आलेल्या रंगात शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक, कॅडमियम यांसारख्या जड धातूंचा समावेश करण्यात आलेले नाही. हा रंग विषहीन असल्याचेही सांगितले जात आहे. या रंगाची किंमतही अतिशय कमी आहे.
9 / 10
रंगाची विक्री वाढली की, गावातील शेण खरेदीलाही हातभार लागेल. यामुळे शेतकऱ्यांची मिळकत वाढेल. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.
10 / 10
खादी तसेच ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकाऱ्यांनुसार, शेतकऱ्यांना केवळ शेणापासून रंग तयार करण्याच्या कारखान्यामुळे ३० हजार रुपये मिळू शकतील. वेदिक पेंटमुळे शेतकऱ्यांना दर किलो शेणामागे ५ रुपये मिळतील. एक गाय दिवसाला २० ते ३० किलो शेण देते. अशात शेतकऱ्यांना दररोज सरासरी १०० रुपये मिळतील आणि ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना साकारल्या जाईल, असे म्हटले जात आहे.
टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रNitin Gadkariनितीन गडकरीpaintingचित्रकला