दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. "भाजपाने निवडणुकीत विजय मिळवला तर अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन महिन्यांत त्यांच्या पदावरून हटवणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "भाजपाचा संविधान बदलण्याचा मानस आहे, त्यामुळेच 400 जागांचा नारा दिला जात आहे. मात्र, संविधानाचे रक्षण करणारा पक्ष असल्याचं भाजपाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक जिंकल्यास ते पाच वर्षे पंतप्रधान राहतील."
"यूपीच्या मतदारांना इंडिया आघाडीला मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मी आज लखनौमध्ये आलो आहे. मला येथे चार मुद्द्यांवर बोलायचं आहे. प्रथम या निवडणुकीत पंतप्रधान मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. दुसरं म्हणजे, भाजपा सत्तेत आल्यास 2-3 महिन्यांत मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाईल. तिसरं - ते संविधान बदलणार आहेत आणि चौथं म्हणजे ते SC आणि ST चं आरक्षण हटवणार आहेत" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
केजरीवाल यांनी केली मोदींच्या निवृत्तीची भविष्यवाणी
केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचीही भविष्यवाणी केली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होतील. मोदींनी 17 सप्टेंबर 2025 रोजी अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 75 वर्षांनंतर ते निवृत्त होणार नाहीत असं पंतप्रधानांनी अद्याप सांगितलेलं नाही. मोदींनी हा नियम बनवला आहे आणि मला पूर्ण आशा आहे की ते या नियमाचं पालन करतील."
"भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील"
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाला किती जागा मिळतील हेही सांगितलं. "भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील असं म्हटलं आहे. हरियाणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या जागा कमी होणार आहेत. भाजपा सत्ता स्थापन करणार नाही. इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.