क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:31 IST2025-04-15T09:16:56+5:302025-04-15T09:31:18+5:30

IPL 2025 Brand Value: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. क्रिकेट हा आता केवळ छंद राहिलेला नाही, तो एक मोठा व्यवसाय बनला आहे.

IPL 2025 Brand Value: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. क्रिकेट हा आता केवळ छंद राहिलेला नाही, तो एक मोठा व्यवसाय बनला आहे. भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. आयपीएलसारखे प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी नव्या बाजारपेठेत येण्यासाठी एक महत्त्वाचा एन्ट्री पॉईंट बनलाय. यामुळे प्रेक्षकसंख्येचे विक्रम मोडले जातात.

२०२५ मध्ये टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, टीम स्पॉन्सरशिप आणि ऑन-फिल्ड जाहिरातींमधून जाहिरातींमधून सुमारे ६,००० ते ७,००० कोटी रुपयांचं जाहिरात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड जिओस्टारच्या क्रिकेट ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

रिअल इस्टेट कंपनी डॅन्यूब प्रॉपर्टीज आणि परफ्यूम ब्रँड लत्ताफा परफ्यूम्स सारखी मोठी नावंही जाहिरातदारांच्या यादीत सामील झालं आहे. यावरून आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतीय बाजारपेठेकडे कशा नजरेनं पाहत आहेत, हे दिसून येतं. डॅन्यूब प्रॉपर्टीज स्टार स्पोर्ट्सवर 'को-पॉवर्ड बाय' प्रायोजक बनली आहे, तर लताफा परफ्यूम्स जिओस्टारच्या क्रिकेट कव्हरेजवर जाहिरात करणारा पहिला आंतरराष्ट्रीय रिटेल ब्रँड ठरला आहे. आयपीएल आता केवळ भारतीय ब्रँडसाठीच नव्हे तर जगभरातील व्यवसायांसाठी एक मोठे व्यावसायिक केंद्र बनलंय.

भारतात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. आता ते जागतिक जाहिरात प्लॅटफॉर्म बनलंय. आयपीएलच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात आपला ठसा उमटवत आहेत. २०२५ मध्ये आयपीएलला जाहिरातींच्या माध्यमातून ६ ते ७ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मैदानावर दिसणाऱ्या जाहिरातींमधून हे उत्पन्न मिळणार आहे.

'कंपनीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. स्टार स्पोर्ट्सवर सुरू असलेल्या टाटा आयपीएलपेक्षा आपला व्यवसाय वाढवण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही. आयपीएल हंगामात सक्रिय असलेल्या एनआरआय गुंतवणूकदारांना त्यांची कंपनी टार्गेट करत आहे. या भागीदारीमुळे दुबईतील रिअल इस्टेटमध्ये रस वाढण्यास मदत होत असल्याचं डॅन्यूब प्रॉपर्टीजचे मालक रिझवान साजन म्हणाले. म्हणजेच आयपीएलमुळे दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जिओस्टारच्या आयपीएल प्लॅटफॉर्मवरील आंतरराष्ट्रीय भागीदारी गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. एमिरॅट्स, एतिहाद, टर्किश एअरलाइन्स आणि कतार एअरवेज सारख्या प्रमुख विमान कंपन्या आणि सौदी अरेबिया आणि मलेशियाच्या पर्यटन मंडळांनीही आयपीएलच्या माध्यमातून त्यांच्या प्रीमियम ट्रॅव्हल आणि लाइफस्टाइल उत्पादनांना प्रोत्साहन दिलं आहे.

आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू १२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सीएसके, एमआय, आरसीबी आणि केकेआर या चार संघांची ब्रँड व्हॅल्यू १० कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, आयपीएल २०२५ च्या पहिल्या १३ सामन्यांमध्ये व्यावसायिक जाहिरातींचे प्रमाण १२% वाढले आहे. जाहिरात श्रेणीत १३ टक्के वाढ झाली आहे ज्यात ५० पेक्षा अधिक कॅटेगकी आणि ३१ टक्के जाहिरातदारांची वाढ झाली आहे. त्यांची संख्या ६५ च्या पुढे गेली आहे.

जिओस्टारचे चीफ बिझनेस ऑफिसर इशान चॅटर्जी यांच्या म्हणण्यानुसार "भारतातील क्रिकेट ही आता केवळ राष्ट्रीय आवड राहिलेली नाही - हे एक जागतिक जाहिरात प्लॅटफॉर्म आहे. या भागीदारीमुळे फायदा होत आहे - लीड जनरेशनपासून ब्रँड लॉयल्टीपर्यंत - जे जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे." म्हणजेच आयपीएलच्या माध्यमातून कंपन्या आपले ग्राहक वाढवत आहेत आणि ब्रँड लॉयल्टीही वाढवत आहेत.

भारतात ८० कोटींहून अधिक स्पोर्ट्स पाहणारे लोक आहेत. यातील बहुतांश जण २५ ते ४५ वयोगटातील आहेत, जे डिजिटलसॅव्ही आणि ब्रँडकॉन्शियस आहेत. अगदी छोट्या शहरांमध्येही लोकांना आता ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या या शहरांना टार्गेट करत आहेत. आयपीएलचे सामने टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही ठिकाणी पाहिले जातात. त्यामुळे या स्पर्धेमुळे ब्रँड्सना मोठी संधी मिळते. ब्रँड दोन महिन्यांच्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आयपीएल हे एक व्यासपीठ आहे जिथे ब्रँड आपला ठसा उमटवू शकतात आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतात. भारतात व्यवसाय करण्याची ही उत्तम संधी आहे.