भारतीयांना क्रेडिट कार्डाचं बिल भरताना येताहेत नाकीनऊ; कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:05 IST2025-07-29T19:00:54+5:302025-07-29T19:05:17+5:30

एकेकाळी वाढत्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि डिजिटल प्रगतीचे प्रतीक असलेल्या भारतातील क्रेडिट कार्डांबद्दलचे वाढते आकर्षण आता अडचणीचे संकेत देत आहे.

क्रेडिट कार्डवरील खरेदी ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आलं आहे. ‘सीआरआयएफ हाय मार्क’च्या अहवालानुसार, मार्च २०२५ पर्यंत क्रेडिट कार्डवरील कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटी रुपयांवर केली आहे. ही रक्कम ३ महिन्यांपेक्षा अधिक काळपर्यंत भरली गेलेली नाही.

९१ ते १८० दिवसपर्यंत थकित क्रेडिट कार्ड कर्जाचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे अहवालात आढळून आले आहे. या श्रेणीतील थकबाकी गेल्यावर्षी २०,८७२.६ कोटी रुपये होती. ती यंदा वाढून २९,९८३.६ कोटी रुपये झाली आहे.

कर्जाची टक्केवारीही वाढत आहे. ९१ ते १८० दिवस थकीत क्रेडिट कार्डवरील कर्ज मार्च २०२५ मध्ये ८.२% पर्यंत गेले. मागील वर्षी ते ६.९% होते. १८१ ते ३६० दिवस थकीत कर्ज २०२४ मध्ये ०.९% होते, ते मार्च २०२५ मध्ये १.१% पर्यंत वाढले.

भारतात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. मे २०२५ पर्यंत एकूण क्रेडिट कार्ड कर्ज २.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी ते २.६७ लाख कोटी होते.

क्रेडिट कार्डांचा वापरही वाढत आहे. मार्च २०२५ पर्यंत क्रेडिट कार्ड व्यवहार (ट्रॅझॅक्शन) २१.०९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्के जास्त आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.