LPG गॅस सिलिंडरची सबसिडी पुन्हा मिळवायचीय? सोप्पे आहे, जाणून घ्या प्रक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:52 PM2021-02-23T14:52:48+5:302021-02-23T15:07:23+5:30

How to Reclaim LPG Subsidy: एलपीजी गॅसच्या किंमती दर महिन्याला वाढविल्या जात आहेत. आज घरगुती वापराचा एलपीजी सिलिंडर मुंबईत आज 769 रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही काही वर्षांपूर्वी केंद्राकडून तुम्हाला मिळत असलेली सबसिडी कोणत्याही कारणाने सोडली असेल तर ती परत मिळवता येणार आहे.

देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत चालले आहेत. आरबीआय गव्हर्नरांनी केंद्र सरकारला महागाईचा दबाव वाढत चालल्याचे सांगितले आहे. तसेच पेट्रोल, डिझेलवरील अप्रत्यक्ष कर कमी करण्यासही सुचविले आहे. अशातच एलपीजी गॅसच्या किंमतीदेखील वाढत चालल्या आहेत.

एलपीजी गॅसच्या किंमती दर महिन्याला वाढविल्या जात आहेत. आज घरगुती वापराचा एलपीजी सिलिंडर मुंबईत आज 769 रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही काही वर्षांपूर्वी केंद्राकडून तुम्हाला मिळत असलेली सबसिडी कोणत्याही कारणाने सोडली असेल तर ती परत मिळवता येणार आहे.

उज्ज्वला गॅस योजनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. यानंतर अनेकांनी ही सबसिडी आपणहून सोडली होती. तर अनेकांना गॅस कंपन्यांनी फोन करून १ नंबर दाबा, दोन नंबर दाबा असे सांगत हातोहात फसविले होते.

आता गॅस सिलिंडरच्या किंमतीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे ही सबसिडी दिलासा ठरणारी होती. मात्र, कंपन्यांच्या कपटीपणामुळे किंवा सबसिडी सोडण्याच्या निर्णयामुळे जर तुम्हाला पुन्हा सबसिडी मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला ती पुन्हा कशी मिळवायची याची प्रक्रिया सांगणार आहोत.

'पहल- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी' (PAHAL- DBTL) ही सुविधा केंद्र सरकार देते. याद्वारे तुम्ही सिलिंडर घेतला की त्याची सबसिडी थेट तुमच्या खात्यात जमा होते.

जर तुम्हाला परत सबसिडी हवी असेल तर तुम्हाला ऑनलाइन PAHAL (DBTL) चा भाग व्हावे लागणार आहे. यासाठी https://mylpg.in/index.aspx वर जाऊन तुमचा 17 अंकी LPG क्रमांक टाकावा लागणार आहे.

जर तुम्हाला हा आयडी माहिती नसेल तर तुमच्या पेट्रोलियम कंपनीचा पर्याय निवडून ग्राहक क्रमांक आणि एलपीजी डिस्ट्रीब्यूटरद्वारे हा आयडी मिळवता येणार आहे. LPG आयडी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करावे, यानंतर पुढील प्रोसेस सुरु होणार आहे.

जर तुम्हाला ऑनलाईन शक्य नसेल तर ऑफलाईन द्वारेही सबसिडी मिळविता येते. त्यासाठी तुमच्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला जावे लागणार आहे. तिथे गेल्यावर एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

या अर्जासोबत आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, गॅस कनेक्शन आणि उत्पन्नाचा दाखला आदीचे झेरॉक्स जोडावे लागणार आहेत. एलपीजी सबसिडी मिळण्यासाठी 10 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असायला हवे.

या दोन्हीपैकी कोणतीही एक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी गॅस एजन्सीकडून तपासणी केली जाईल. जर सर्व ठीक असल्यास एक आठवड्यानंतर तुम्हाला LPG सब्सिडी दिली जाईल.

य़ाबाबतच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे संपर्क साधू शकता. किंवा तुमच्या गॅस कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.