तुमची ५० रुपयांची ऑर्डर घरापर्यंत पोहचवून डिलिव्हरी बॉय किती कमावतात?; गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:08 IST2025-01-30T16:00:42+5:302025-01-30T16:08:57+5:30

घरी भाजी संपली असेल किंवा छोटी मोठी वस्तू मागवायची असेल तर सध्या मार्केटला जाण्याची गरज भासत नाही. ऑनलाईन ग्रोसरीच्या माध्यमातून काही मिनिटांत घरी सामान पोहचते. ऑर्डर केल्यानंतर १० मिनिटांत डिलिव्हरी बॉय तुमच्या घरचा दरवाजा ठोठावतो. त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतो का, आपल्या इतक्या कमी किंमतीच्या ऑर्डरमागे डिलीवरी चार्ज, जीएसटी आणि डिलीवरी बॉयला किती पैसे मिळतात?

आता या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांकडे नसणार मग हेच जाणून घेण्यासाठी एका डिलिव्हरी स्टोअरला काही पत्रकार भेट देतात. तिथे अनेक डिलिव्हरी बॉय लोकांच्या घरी सामान पोहचवण्यासाठी उभे असतात. त्यातील काही डिलिव्हरी बॉयशी संवाद साधला जातो. अखेर तुम्हाला किती पैसे मिळतात. तुमची कमाई कशी होते त्यानंतर याचं उत्तर मिळते.

सहा महिन्यापासून काम करणारा डिलिव्हरी बॉय शिवम सांगतो की, रायडरची इतकीही कमाई होत नाही. आम्ही दिवसाला ३५-४० सामान डिलिव्हरी करतो. एका किमीच्या राईडवर डिलिव्हरी बॉयच्या खात्यात १०-१५ रुपये येतात. सरासरी पकडली तर १ किमी मागे ९ रुपये मिळतात. मग ग्राहकांची ऑर्डर ५० रुपये असो वा ५०० रुपये, डिलिव्हरी बॉयला किमी हिशोबाने पैसे दिले जातात.

डिलिव्हरी बॉयला जॉब कसा मिळतो? - ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी APP च्या कंपनीशी जोडण्यासाठी तुम्हाला अकाऊंट बनवावं लागते. त्यासाठी आधार कार्ड आणि अन्य ओळखपत्र लागते. त्यानंतर सर्व डिटेल्स भरल्यानंतर कंपनीला पाठवण्यात येते. कंपनीने खातरजमा केल्यानंतर काम मिळते. वाहनाची सोय डिलिव्हरी बॉयला स्वत: करावी लागते.

डिलिव्हरी बॉयची कमाई फक्त आणि फक्त ऑर्डर डिलिव्हरीवर निर्भर असते. जितके जास्त ऑर्डर डिलिव्हरी मिळतील तितकी कमाई जास्त होते. सणांच्या दिवशी कुठल्याही प्रकारे अतिरिक्त बोनस अथवा पैसे मिळत नाही. कंपनीकडून कुठलाही इन्सेटिव्ह दिला जात नाही. परंतु सणांच्या दिवशी ऑर्डर जास्त असतात त्यामुळे कमाई जास्त होते.

अनेकदा ग्राहकांना डिलिव्हरी बॉयला टिप देण्याचा ऑप्शन असतो. जर ग्राहकाने काही टिप दिली तर ती डिलिव्हरी बॉयला मिळते. जर कंपनीकडून ग्राहकांपर्यंत पोहचवणारं सामान हरवले तर त्याची जबाबदारी डिलिव्हरी बॉयवरच असते.

सामान डिलिव्हरी करताना एखाद्याचा अपघात घडू नये किंवा घडल्यास त्याची खबरदारी कंपनी घेते. सर्व डिलिव्हरी बॉयला स्वत:चे इन्शुरन्स काढावे लागते आणि त्यासाठी कंपनीला ठराविक रक्कम द्यावी लागते.

डिलिव्हरी बॉय कंपनीला १५०० रुपये देतात. ही रक्कम कमीही होते किंवा वाढूही शकते. डिलिव्हरी बॉयचं १ वर्षाचं इन्शुरन्स असते. जर कामावेळी अपघात घडला तर कंपनी इन्शुरन्समधून त्याचा खर्च उचलते.

डिलिव्हरी बॉयच्या वागणुकीवरून ग्राहकांकडे त्याची तक्रार करण्याचा पर्याय असतो तसाच डिलिव्हरी बॉयसोबत काही अनुचित प्रकार घडत असेल तर त्यालाही सुरक्षेचा अधिकार आहे.

कंपनीने APP वर इमरजेन्सी बटन दिलेले असते. ते बटन दाबल्यास आसपासच्या पोलीस स्टेशनला कॉल जातो, त्यातून बेशिस्त ग्राहकांवर पोलीस कारवाई होऊ शकते असं डिलिव्हरी बॉय सांगतात.