Home Loan : डोक्यावर घराचे कर्ज आणि कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:25 PM2022-02-24T13:25:22+5:302022-02-24T13:31:35+5:30

एखाद्या कुटुंबावर गृहकर्ज असेल आणि कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना गमवले. यामध्ये जे अनेक लोक होते ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. एखाद्या कुटुंबावर गृहकर्ज असेल आणि कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जर कुटुंबानेही कर्ज फेडले नाही तर काय होईल? बँक घराचा लिलाव करेल किंवा संबंधित कुटुंबाकडेही काही पर्याय असतात का याविषयी...

कोणत्याही प्रकारचे गृहकर्ज संरक्षण नसेल तर बँक कर्ज चुकवण्याची जबाबदारी कायदेशीर वारस, हमीदार यांची असते.

कर्ज भरणाऱ्या व्यक्तीची कर्ज भरण्याची क्षमता आणि आर्थिक स्थिती यावरून एक नवा करार केला जातो. जर असे करूनही कर्ज फेडले न गेल्यास संबंधित घर/मालमत्ता विकून आपले नुकसान भरून काढण्याचा बँकेला पर्याय असतो.

जर कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंब कर्जाचे ईएमआय भरण्यासाठी पैशाची व्यवस्था करण्यास असमर्थ ठरते. अशा वेळी बँकेला याची माहिती द्यावी. त्यामुळे बँक ईएमआय कमी करून देण्याचा प्रयत्न करते. यामुळे संबंधित कुटुंबाला कर्ज फेडण्यासाठी वेळ मिळतो. यात काही बँका ईएमआय हॉलिडेचाही पर्याय देतात.

बँक संबंधित कुटुंबाला घरावर ताबा घेण्यासाठी काही ठरावीक वेळ देते. ९० दिवस ईएमआय न भरल्यास बँक त्या प्रॉपर्टीला एनपीए घोषित करते. त्यानंतर बँकेकडून ६० दिवसांत कर्ज फेडण्यासाठी नोटीस दिली जाते. जर यानंतरही ३० दिवसांच्या आत बँकेला उत्तर दिले नाही तर बँक घर लिलावामध्ये काढते.

गृहकर्ज घेताना बँक कर्ज विमा पॉलिसी घेण्याचा पर्याय देते. जर कर्जदाराचा काही कारणाने मृत्यू झाल्यास विमा कंपनी संबंधित राहिलेली रक्कम बँकेत जमा करते. यासह आपण कर्ज रकमेइतका टर्म इन्शुरन्सही घेऊ शकता. यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाल्यास ही रक्कम गृहकर्ज फेडण्यासाठी वापरता येते.