२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:13 IST2025-09-15T12:09:22+5:302025-09-15T12:13:38+5:30

GST Rate Cut : जीएसटी दरांमधील या मोठ्या आणि ऐतिहासिक बदलाचा फायदा घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीवर उपलब्ध असेल.

केंद्र सरकारने सणासुदीपूर्वी जीएसटी कपातीच्या रुपात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात जीएसटीचे (GST) नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे या वर्षी सणांसाठी खरेदी करणे आधीच्या तुलनेत खूपच स्वस्त होणार आहे.

सरकारने टीव्ही, फ्रीज, एसी यांसारख्या सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून कमी करून १८ टक्के केला आहे. यामुळे, या उत्पादनांवर ग्राहकांची थेट १०% बचत होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्यामुळे ग्राहकांना ५०० ते २००० रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.

या ऐतिहासिक बदलाचा फायदा घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मिळेल. यामध्ये टीव्ही, एसी, कूलर, पंखे, डिशवॉशर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, हेअर ड्रायर आणि ट्रिमर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

याशिवाय, रोजच्या वापरातील साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, हेअर ऑइल यांसारख्या ९९% वस्तूंना १२% च्या जीएसटी स्लॅबमधून काढून ५% च्या जीएसटी स्लॅबमध्ये टाकले जात आहे.

जीएसटी परिषदेने १२% आणि २८% च्या टॅक्स स्लॅबला पूर्णपणे काढून टाकले आहे. आता २२ सप्टेंबरपासून जीएसटी प्रणालीमध्ये केवळ दोनच मुख्य स्लॅब असतील: ५% आणि १८%. या व्यतिरिक्त, लक्झरी आणि काही विशिष्ट वस्तूंसाठी ४०% चा एक नवीन जीएसटी स्लॅब सुरू केला जाईल.