ड्रॅगन चीनभोवती आर्थिक संकटाचा फास आवळला; पैशांच्या बचतीसाठी करावा लागतोय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 10:14 PM2024-04-06T22:14:53+5:302024-04-06T22:19:01+5:30

चीनची आर्थिक परिस्थिती सध्या डबघाईला आली आहे. चीनमध्ये बांधकाम क्षेत्रावर संकट अधिक गडद झालं आहे. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्याच वेळी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. चीनच्या आर्थिक संकटामागं अनेक कारणे आहेत.

चीनमध्ये मंदावलेला विकास दर, कमी परकीय गुंतवणूक, प्रॉपर्टी क्षेत्रातील संकट, कमी निर्यात, चलनाचे दर घसरणे आणि तरुणांची सातत्याने वाढती बेरोजगारी यामुळे संकट वाढतंय. चीनमधील लोकांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे ७० टक्के गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली आहे.

रिपोर्टनुसार, २०२२ च्या अखेरीस सुमारे ७८ कोटी चीनी नागरिक कर्जात बुडाले होते आणि त्यांचे सर्व कर्ज रिअल इस्टेटमध्ये होते. २०२१ मध्ये चीनी सरकारने बिल्डर्ससाठी कर्जाची मर्यादा मर्यादित केली. यानंतर अनेक बिल्डर डिफॉल्टर झाले आहेत. सध्या शेकडो प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत.

लोकांनी आता हप्ते भरणेही बंद केलं आहे. चीनमधील लोकांनी पैसे खर्च करणंही जवळपास कमी केलं आहे. पैशाच्या बचतीसाठी लोक प्रयत्न करत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागतोय. झीरो कोविड नीती लागू ठेवण्यानं चीनची अर्थव्यवस्था फार कमी काळासाठी सावरण्यात यश आलं.

आता चीनमधील मालमत्ता बाजारातील संकट अधिक तीव्र झालं आहे. चीनमध्ये महागाई दर आणि परदेशी गुंतवणूक कमी होत आहे आणि स्थानिक सरकारांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. अलीकडील अधिकृत आकडेवारीनुसार, चीनमधील बेरोजगारीचा दर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे.

आता चीनमधील लोकांनी त्यांचा खर्च खूपच कमी केला आहे. चीनमधील लोक बचतीच्या मागे आहेत. बचत वाढवण्याच्या चीनी सामान्य लोकांच्या वाढत्या इच्छेमुळे चीनला आपली अर्थव्यवस्था पुन्हा संतुलित करणे अधिक कठीण होईल.

खर्चापेक्षा बचतीवर चीनी लोकांचा भर आहे. पूर्वी लोक सुपरमार्केटमध्ये खूप खर्च करायचे. आता लोक त्यांच्या गरजेनुसार बचत आणि खर्च करण्यासाठी यादी तयार करतात. लोकांनी आता अनावश्यक खर्च करणेही बंद केले आहे.

चीनमधील लोक बचतीसाठी जुन्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. चीनमध्ये आता बहुतांश व्यवहार रोखीने होतात. त्यामुळे घरी बचतीचे पैसे रोख ठेवण्याकडे लोकांचा कल आहे. त्यातून खर्च कमी होऊ शकतो असं लोकांना वाटतं. याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे.