या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
By जयदीप दाभोळकर | Updated: May 6, 2025 09:08 IST2025-05-06T09:07:37+5:302025-05-06T09:08:37+5:30
११ मे रोजी मदर्स डे येणार आहे. या मदर्स डे ला, फक्त साडी किंवा दागिने देण्याऐवजी, तुमच्या आईला अशी भेट द्या जे तिचं भविष्य सुरक्षित करेल. जाणून घेऊ तुम्ही आईला कोणतं आर्थिक गिफ्ट देऊ शकता.

११ मे रोजी मदर्स डे येणार आहे. या मदर्स डे ला, फक्त साडी किंवा दागिने देण्याऐवजी, तुमच्या आईला अशी भेट द्या जे तिचं भविष्य सुरक्षित करेल. आजच्या काळात, गुंतवणूकीची भेट ही आईसाठी सर्वात हुशार भेटू शकेल. या मदर्स डे ला, तुमच्या आईच्या नावावर एफडीचा गुंतवणूक पर्याय निवडा. तुमच्या आईच्या नावावर एफडी करून तुम्ही तिचा वृद्धापकाळ सुरक्षित करू शकता.
हल्ली मदर्स डे खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. म्हणून यावेळी मदर्स डे खास बनवण्यासाठी, तुमच्या आईच्या नावानं काही गुंतवणूक सुरू करू शकता. म्हणून जर तुम्ही या मदर्स डे ला तुमच्या आईच्या नावानं गुंतवणूक सुरू करणार असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटचा (FD) पर्याय निवडू शकता. तुम्ही तुमच्या आईच्या नावानं कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून एफडी करू शकता.
फिक्स्ड डिपॉझिट हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. आता जर तुम्हाला तुमच्या आईला सुरक्षित भविष्य द्यायचं असेल तर फिक्स्ड डिपॉझिट करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या आईच्या नावावर एफडी केली तर चांगल्या व्याजाव्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक फायदे मिळू शकतात.
जर आईचं वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, म्हणजेच तिचा ज्येष्ठ नागरिकांच्या यादीत समावेश असेल, तर जर तिच्या नावावर एफडी केली तर तिला सुमारे ०.५० टक्के अधिक परताव्याचा लाभ मिळेल. जर आई सध्या सुपर ज्येष्ठ नागरिकांच्या यादीत असेल तर तिला सुमारे ०.७५ ते ०.८० टक्के अधिक व्याज मिळू शकतं. (प्रत्येक बँकेचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एफडी व्याजदर वेगळा असतो.)
एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस (Tax Deducted at Source) वजा केला जातो. आईच्या नावावर केलेल्या एफडीमधून आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर १०% टीडीएस कापला जाईल.
जर तुम्ही तुमच्या आईच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त परतावा तर मिळेलच पण अशा प्रकारे तुम्ही तुमचा करदेखील वाचवू शकता. जर आई ज्येष्ठ नागरिक असेल आणि तिच्याकडे उत्पन्नाचा कोणताही पर्याय नसेल किंवा ती कमी कराच्या कक्षेत येत असेल, तर त्याचेही अनेक फायदे होऊ शकतात.
(टीप: बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)