डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:19 IST2025-04-28T13:17:48+5:302025-04-28T13:19:59+5:30
public wi fi : अनेकदा आपण डेटा संपला की सार्वजनिक वाय-फायचा पर्याय शोधतो. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट देखील अशी सुविधा देतात. पण, असे करणे सायबर ठग आणि स्कॅमर्ससाठी तुम्ही सोपं सावज ठरता.

आजच्या काळात इंटरनेट ही लोकांची गरज बनली आहे. लोक इंटरनेटशिवाय थोडा वेळही घालवू शकत नाहीत. भारतातील तरुण रोज सरासरी ३ तास मोबाईल पाहण्यात घालवतात. यावरुन तुम्हाला अंदाच आलाच असेल. आता तर ५ जी इंटरनेट स्पीड आल्याने डेटाही वेगाने संपून जातो.
अशा परिस्थितीत, जर डेटा संपला किंवा अन्य कोणत्याही कारणाने नेट चालत नसेल तर लोक पब्लिक वाय-फायशी फोन कनेक्ट करतात. तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
वास्तविक, सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित नाहीत. तुम्ही अशा इंटरनेटशी तुमचा फोन जोडला तर सायबर गुन्हेगार आणि स्कॅमर्ससाठी सोपं सावज ठरतं. सायबर गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्यासाठी सार्वजनिक वाय-फाय वापरतात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) म्हणते की बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन शॉपिंगसारख्या गोष्टींसाठी सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरू नये.
याशिवाय, सार्वजनिक वाय-फाय वापरून कधीही ऑनलाइन पेमेंट किंवा आर्थिक संबंधित कोणतेही काम करू नका.
कोणीही सार्वजनिक वाय-फाय वापरू शकतो. अशा परिस्थितीत, स्कॅमर सहजपणे सार्वजनिक वाय-फाय हॅक करतात आणि लोकांची वैयक्तिक माहिती देखील सहजपणे चोरतात, ज्याद्वारे ते सायबर फसवणूक आणि गुन्हे करतात.