PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा, 'ही' सुविधा मिळणार मोफत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 16:31 IST2020-04-25T15:57:01+5:302020-04-25T16:31:34+5:30

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यात खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे बँकांमध्ये लोकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बँकांमध्ये गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना विविध सुविधा देत डिजिटल बँकिंगचा वापर करण्यास सांगितले जात आहे. यातच देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना खास गिफ्ट दिले आहे.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग अॅपच्या माध्यामातून ट्रान्जक्शनवर IMPS चार्ज बंद केला आहे. यासंबंधीची माहिती बँकेने ट्विट केली आहे.
बँकेने केलेला हा बदल तत्काळ लागू करण्यात आला आहे. IMPS म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून लगेच पैसे ट्रान्सफर होतात.
या सर्व्हिससाठी बँकांकडून 2 ते 10 रुपयांपर्यंत चार्ज लागू केले जाते. IMPS मधून पैसे ट्रान्सफर करण्याचा मोठा फायदा हा आहे की, तुम्ही प्रत्येक दिवशी, 24 तास या सर्व्हिसचा वापर केला जाऊ शकतो.
गेल्या 1 एप्रिलला ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झाले आहे.
या विलीनीकरणामुळे बँकेजवळ 11000 हून अधिक शाखा आहेत. तर 13000 हून अधिक एटीएम, एक लाख कर्मचारी आहेत.